Miss South Africa Mia Le Roux: ‘मिस साउथ आफ्रिका’ हा किताब जिंकणारी मिया ले रॉक्स ही पहिली मूकबधिर महिला स्पर्धक ठरली आहे. विभाजनात्मक स्पर्धेतील एका अंतिम स्पर्धकाला तिच्या नायजेरियन कनेक्शनमुळे ट्रोल करण्यात आल्यानंतर स्पर्धेतून माघार घ्यावी लागली. त्यानंतर मिया ले रॉक्स हिची विजेती म्हणून निवड करण्यात आली. हा मानाचा किताब स्वीकारल्यानंतर ‘मिस साऊथ आफ्रिका’ ठरलेल्या मिया ले रॉक्सच्या भावना दाटून आल्या. तिने या मंचावर आपल्या भावना व्यक्त करताना म्हटलं की, ‘आता माझ्यासारख्या अनेक लोकांना पुढे येण्याची प्रेरणा नक्की मिळेल.’
‘मिस साऊथ आफ्रिका’ जिंकल्यानंतर दिलेल्या भाषणात मिया ले रॉक्स म्हणाली की, ‘मला आशा आहे की, ज्या लोकांना समाजापासून अलिप्त वाटत आहे अशा लोकांना, जशी मी करत आहे तशीच त्यांची मोठी स्वप्ने पूर्ण करण्यात मदत होईल.’ मिया म्हणाली की, तिला ‘आर्थिकदृष्ट्या वंचित आणि अपंग’ लोकांना मदत करायची आहे.
गेल्या आठवड्यात, या स्पर्धेत मोठा हंगामा पाहायला मिळाला होता. २३ वर्षांची, कायद्याची विद्यार्थिनी असलेल्या चिदिन्मा अदेत्सिना हिच्यावर तिच्या आईने दक्षिण आफ्रिकन महिलेची ओळख चोरल्याचा आरोप केल्यानंतर स्पर्धेतून माघार घेतली होती. चिदिन्मा अडेत्सिना हिचा जन्म दक्षिण आफ्रिकेतील नायजेरियन वडील आणि मोझांबिकन वंशाच्या आईच्या पोटी झाला. अनेक आठवड्यांपासून ती सोशल मीडियावर सुरू असलेल्या वादळाच्या केंद्रस्थानी होती. कॅबिनेट मंत्र्यासह अनेकांनी देशाचे प्रतिनिधित्व करण्याच्या तिच्या अधिकारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. मात्र, याविषयी बोलताना चिदिन्मा म्हणाली की, ती ‘ब्लॅक-ऑन-ब्लॅक’ द्वेषाला बळी पडली आहे, ज्याला दक्षिण आफ्रिकेत ‘ॲफ्रोफोबिया’ म्हणून ओळखले जाते, जे इतर आफ्रिकन देशांतील लोकांमध्ये सामान्य आहे.
‘मिस साऊथ आफ्रिका’ जिंकणारी मिया ले रॉक्स ही २८ वर्षांची असून, तिला वयाच्या पहिल्या वर्षी गंभीर आजारात श्रवणशक्ती कमी झाल्याचे निदान झाले होते. तिला आवाज ओळखण्यासाठी आणि समजून घेण्यासाठी मदत करणारे कॉक्लियर इम्प्लांट बसवण्यात आले आहेत. मिया म्हणाली की, तिला आपले पहिले शब्द बोलण्यासाठी दोन वर्षे स्पीच थेरपी घ्यावी लागली होती. मिया आपल्या भावना व्याक्य करताना म्हणाली की, ‘मला दक्षिण आफ्रिकेतील मूकबधिर महिला असल्याचा अभिमान आहे आणि मला माहित आहे की, बहिष्कृत असणे कसे वाटते. मला माहित होतं माझा जन्म ही बंधन आणि लोकांच्या विचारांची चौकट तोडण्यासाठीच झाला होता. आणि आज रात्री मी ते करून दाखवलं आहे.’