Mirzapur 3 Poster Release: क्राईम थ्रिलर वेब सीरिज 'मिर्झापूर'च्या तिसऱ्या सीझनची चाहते आतुरतेने वाट पाहत होते. प्रेक्षकांचा हाच उत्साह पाहून निर्मात्यांनी १९ मार्चला 'मिर्झापूर ३' चा टीझर सोशल मीडियावर रिलीज होणार असल्याचेही जाहीर केले होते. ही बातमी कळताच चाहत्यांचा उत्साह द्विगुणित झाला होता. मात्र, १९ मार्चला संध्याकाळी निर्मात्यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला, जो या सीरिजचा टीझर नव्हता. या व्हिडीओमध्ये फक्त पोस्टर आणि छोटीशी झलक दिसली. यातून मुन्ना भैया म्हणजेच अभिनेता दिव्येंदू शर्मा देखील गायब दिसला. हा टीझर पाहून चाहते संतापले आहेत. त्यामुळे संतप्त चाहत्यांनी आपला राग निर्मात्यांवर काढला आहे.
मिर्झापूरचा ‘गुड्डू पंडित’ म्हणजेच अभिनेता अली फजलने सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर केला होता, त्यानंतर 'मिर्झापूर ३'चा टीझर १९ मार्चला रिलीज होणार असल्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र, टीझरच्या नावावर निर्मात्यांनी फक्त पोस्टर रिलीज केले. तर, प्राईम व्हिडीओने देखील सोशल मीडियावर 'मिर्झापूर ३'चे पोस्टर शेअर केले आहे, ज्यामध्ये एक खुर्ची दिसत आहे आणि ती पेटलेली दिसली आहे.
प्राईम व्हिडीओने हे पोस्टर शेअर करत त्याला कॅप्शन दिले आहे की, 'सिंहासनावर आपला दावा मांडत, गुड्डू आणि गोलू एका नवीन स्पर्धकाविरुद्ध उभे ठाकले आहेत. या आगीत ते जळून खाक होतील की, शक्तीशाली सत्तेची खुर्ची कायमची नष्ट करतील?’ वेब सीरिजचे पोस्टर रिलीज होताच यातील स्टार कास्टही समोर आली आहे. पंकज त्रिपाठी, अली फजल, श्वेता त्रिपाठी शर्मा, रसिका दुग्गल, विजय वर्मा, हर्षिता गौर, अंजुम शर्मा, प्रियांशू पैन्युली, शीबा चड्ढा, राजेश तैलंग, मनु ऋषी चड्ढा ‘मिर्झापूर ३’मध्ये दिसणार आहेत.
सोशल मीडियावर 'मिर्झापूर ३'ची स्टारकास्ट समोर येताच मुन्ना भैय्याच्या चाहत्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. मुन्ना भैया उर्फ दिव्येंदू शर्माचे नाव या स्टारकास्टमध्ये नाही, ज्यामुळे तो तिसऱ्या सीझनमध्ये दिसणार नसल्याचे स्पष्ट होत आहे. आता चाहत्यांनी या पोस्टरवर कमेंट करत दिव्येंदू शर्माशिवाय म्हणजेच दिव्येंदू शर्मा नसेल तर, आम्ही ‘मिर्झापूर ३’ पाहणार नसल्याचे म्हटले आहे. ‘मिर्झापूर’च्या पहिल्या सीझनमध्ये गुड्डू पंडितच्या कुटुंबाला उद्ध्वस्त करण्याची कहाणी दाखवण्यात आली होती. दुसऱ्या सीझनमध्ये कुटुंबातील खुनाचा बदला घेण्याची कथा दाखवण्यात आली होती. गुड्डू भैय्याला मिर्झापूरची गादी हवी होती, ज्यासाठी त्याने खूप रक्तपात देखील केला. आता प्रेक्षकांना तिसऱ्या सीझनची प्रतीक्षा आहे. ‘मिर्झापूर ३’ची रिलीज डेट अद्याप समोर आलेली नाही. मात्र, या वर्षाच्या अखेरीस ही वेब सीरिज प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.