Malayalam Film Industry : गेल्या काही दिवसांपासून मल्याळम फिल्म इंडस्ट्रीमध्ये अभिनेत्रींवर होणाऱ्या लैंगिक अत्याचाराचे प्रकार समोर येत आहेत. या अभिनेत्रींनी लैंगिक अत्याचार करणाऱ्या पुरुष निर्माते व दिग्दर्शक यांच्याविरोधात तक्रार केली. यानंतर आता प्रसिद्ध साऊथ अभिनेत्रीने आणखी एक धक्कादायक खुलासा केला आहे. वॅनिटी वॅनमध्ये छुप्या कॅमेऱ्यांद्वारे अभिनेत्री कपडे बदलताना त्याचं व्हिडीओ रेकॉर्डिंग केलं जायचं, असा गंभीर आरोप या अभिनेत्रीने केला आहे. त्यानंतर सर्वत्र खळबळ उडाली आहे.
हेमा समितीने जाहिर केलेल्या अहवालानंतर मल्याळम फिल्म इंडस्ट्रीमधील अनेक अभिनेत्रींनी पुढे येऊन लैंगिक शोषणावर वक्तव्य केले. हिंदी चित्रपटांमध्येही काम केलेली प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री राधिका सरतकुमार यांनी देखील एक अनुभव सांगितला आहे. त्यांनी शुटिंगच्या वेळी वापरण्यात येणाऱ्या व्हिनिटी व्हॅनमध्ये छुपे कॅमेरा लावलेले असायचे असा खुलासा केला आहे. तसेच व्हॅनिटीमध्ये कपडे बदलत असताना अभिनेते त्या कॅमेराच्या माध्यमातून सर्व काही पाहात असायचे असे देखील म्हटले आहे.
अभिनेत्री राधिका सरतकुमार यांनी नुकताच गौप्यस्फोट केला. एकदा केरळमध्ये एका प्रोजेक्टवर त्या काम करत होत्या, तेव्हा त्यांना समजले की, अभिनेत्री कपडे बदलताना रेकॉर्ड करण्यालाठी व्हॅनिटी व्हॅनमध्ये छुपे कॅमेरे बसवण्यात आले आहेत. क्रू मेंबर्सने व्हॅनिटी व्हॅनमध्ये कपडे बदलणाऱ्या महिलांच्या व्हिडीओ क्लिप्स रेकॉर्ड करुन आणि त्याचा डेटाबेसही ठेवला, असा दावा त्यांनी केला आहे. त्यांनी पुढे दावा केला की, अभिनेत्रींचे आक्षेपार्ह व्हिडीओ अभिनेत्याच्या फोनवर पाहिले आहेत. त्या म्हणाल्या की, मी पाहिले की अभिनेत्री व्हॅनिटी व्हॅनमध्ये कपडे बदलतानाचे व्हिडीओ अभिनेते मोबाईलवर पाहत होते.
वाचा: हेमा कमिटीच्या रिपोर्टवर समंथाने केलं भाष्य; तेलुगू इंडस्ट्रीत होणाऱ्या लैंगिक शोषणावर म्हणाली…
"मी केरळमध्ये सेटवर असताना पाहिले की, लोक एकत्र जमले आहेत आणि काहीतरी पाहुन हसत आहेत. मी जवळ गेल्यावर मला दिसले की, ते व्हिडीओ पाहत आहेत. मी क्रू मेंबरला कॉल केला आणि त्याला विचारले की ते काय पाहत आहेत. मला सांगण्यात आले की व्हॅनिटी व्हॅनमध्ये कॅमेरे लावण्यात आले होते आणि त्यातून महिलांचे कपडे बदलतानाचे फुटेज घेण्यात आले होते. मला सांगण्यात आले की तुम्ही फक्त कलाकारांचे नाव टाइप केल्यास तुम्हाला त्यांचे कपडे बदलतानाचे व्हिडीओ मिळतील" असे राधिका नमस्ते केरळला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हणाल्या.