Merry Christmas Movie Opening Collection: बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ ही पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी तयार झाली आहे. कतरिना कैफ आणि साऊथ स्टार विजय सेतुपती यांची मुख्य भूमिका असलेला ‘मेरी ख्रिसमस’ हा चित्रपट आज (१२ जानेवारी) प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात एक हटके कथा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेला हा चित्रपट पाहण्यासाठी आता प्रेक्षक देखील आतुर झाले आहेत.यासोबतच चित्रपटाच्या पहिल्या दिवसाची कमाई किती होईल, याकडे देखील सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. मात्र, तज्ज्ञांच्या मते हा कतरिनाचा सर्वात कमी कमाई करणारा चित्रपट ठरणार आहे.
‘आउटलुक’च्या रिपोर्टनुसार, कतरिना कैफ आणि विजय सेतुपती यांचा ‘मेरी ख्रिसमस’ हा चित्रपट पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर १.५ कोटींची कमाई करू शकतो. मात्र, या चित्रपटाला काही सुट्ट्यांचा फायदा देखील मिळू शकतो. ‘मेरी ख्रिसमस’च्या रिलीज दरम्यान लाँग विकेंड देखील आला आहे. त्यामुळे प्रेक्षक हा चित्रपट पाहण्यासाठी चित्रपटगृहाकडे वळू शकतात. इतकंच नाही, तर ‘मेरी ख्रिसमस’च्या रिलीज दरम्यान इतर कोणताही बिग बजेट चित्रपट रिलीज होणार नाहीये. याचा फायदा देखील चित्रपटाला मिळू शकतो.
मात्र, बॉक्स ऑफिस कलेक्शनच्या पहिल्या दिवशीची अंदाजे आकडेवारी पाहता, हा चित्रपट अभिनेत्री कतरिना कैफ हिच्या चित्रपट कारकिर्दीतील सगळ्यात कमी ओपनिंग घेणारा चित्रपट ठरणार असल्याचे म्हटले जात आहे. कतरिना कैफच्या या चित्रपटाने जरी पहिल्या दिवशी १.५ किंवा २ कोटी रुपयांची कमी केली तरी, कतरिनासाठी ही सगळ्यात कमी ओपनिंग ठरणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार, अभिनेत्री कतरिना कैफ हिच्याएकाही चित्रपटाने इतक्या कमी कोटींची ओपनिंग केलेली नाही. कतरिना कैफच्या सुपर फ्लॉप ठरलेल्या'फोन भूत' या चित्रपटाने पहिल्या दिवशी तिकीट बारीवर २.०५ कोटींची कमाई केली होती.
श्रीराम राघवन दिग्दर्शित'मेरी ख्रिसमस' हा एक सस्पेन्स थ्रिलर चित्रपट आहे. कतरिना कैफ आणि विजय सेतुपती या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाचा ट्रेलर आणि गाणे चाहत्यांना खूप आवडले आहे.