Merry Christmas Box office Collection Day 6: अभिनेत्री कतरिना कैफ आणि अभिनेता विजय सेतुपती यांच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘मेरी ख्रिसमस’ या चित्रपटाकडून लोकांना खूप अपेक्षा होत्या. या चित्रपटाची लोक खूप दिवसांपासून वाट पाहत होते. त्यांचा हा चित्रपट १२ जानेवारी रोजी प्रदर्शित झाला असून, समीक्षकांसोबतच प्रेक्षकांकडूनही या चित्रपटाला संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे. मात्र, तरीही हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई करू शकलेला नाही. सध्या बॉक्स ऑफिसवर मेरी ख्रिसमसची परीस्थिती खूपच वाईट आहे. ६० कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाला १५ कोटी रुपयांचा गल्ला जमवणं कठीण झालं आहे. या चित्रपटाने रिलीजच्या सहाव्या दिवशीही फारशी कमाई केलेली नाही.
‘मेरी ख्रिसमस’ या चित्रपटाच्या रिलीजसोबतच अनेक साऊथ चित्रपटही बॉक्स ऑफिसवर येऊन थडकले आहेत. या साऊथ चित्रपटांनी बॉलिवूड चित्रपटांना मागे टाकले आहे. हे सगळेच चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहेत. महेश बाबूचा ‘गुंटूर करम’ असो किंवा तेजा सज्जाचा ‘हनुमान’, हे चित्रपट १०० कोटींच्या क्लबमध्ये सामील होण्यासाठी सज्ज झाले आहेत. तर, ‘मेरी ख्रिसमस’ मात्र टिकून राहण्यासाठी देखील धडपड करत आहे.
सध्या बॉक्स ऑफिसवर दाक्षिणात्य चित्रपटांचा दबदबा आहे. त्यामुळे ‘मेरी ख्रिसमस’ हा चित्रपट मागे पडला आहे. सॅकनिल्कच्या अहवालानुसार, ‘मेरी ख्रिसमस’ चित्रपटाने सहाव्या दिवशी १.१५ कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. पहिल्या दिवशी या चित्रपटाने २.४५ कोटी, दुसऱ्या दिवशी ३.४५ कोटी, तिसऱ्या दिवशी ३.८३ कोटी, चौथ्या दिवशी १.६५ कोटी आणि पाचव्या दिवशी १.३० कोटी कमावले आहेत. आतापर्यंत या चित्रपटाने एकूण १३.८३ कोटींचे कलेक्शन केले आहे. हा चित्रपट १५ कोटींपासून देखील अजून दूर आहे. मात्र, वीकेंडला या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळू शकतो असे म्हटले जात आहे.
श्रीराम राघवन दिग्दर्शित 'मेरी ख्रिसमस' हा एक थ्रिलर चित्रपट आहे. कतरिना आणि विजय सेतुपतीची मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट हिंदी आणि तमिळ भाषेत एकाच वेळी प्रदर्शित झाला आहे. पहिल्या दिवसापासून हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर कमाई करण्यासाठी धडपडत आहे. कतरिना आणि विजयसोबतच संजय कपूर, टिनू आनंद, विनय पाठक या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका साकारताना दिसले आहेत. या चित्रपटात राधिका आपटेचा कॅमिओ देखील आहे.