सध्या मालिका विश्वामध्ये धमाका पाहायला मिळत आहे. एकापेक्षा एक भारी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. गेल्या महिन्यात झी मराठी वाहिनीवर ‘पारू’, ‘शिवा’, ‘लाखात एक आमचा दादा’ या तीन नव्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आल्या. या मालिका प्रेक्षकांच्या पसंतीला देखील उतरताना दिसत आहेत. यातच भर घालत आता आणखी एक नवी कोरी मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येण्यास सज्ज झाली आहे. ही मालिका म्हणजे ‘सावळ्याची जणू सावली.’ पण या मालिकेचा प्रोमो प्रदर्शित होताच सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे.
‘सावळ्याची जणू सावली’ या मालिकेची गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरु आहे. आता अखेर या मालिकेचा प्रोमो प्रदर्शित झाला आहे. या मालिकेत या मालिकेत ‘काव्यांजली’ फेम प्राप्ती रेडकर महत्त्वपूर्ण भूमिका साकारताना दिसणार आहे. तसेच अभिनेत्री भाग्यश्री दळवी, अभिनेत्री मेघा धाडे, अभिनेता साईंकित कामत देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. चाहत्यांमध्ये या मालिकेची आतुरता असतानाच प्रोमो पाहून नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.
‘सावळ्याची जणू सावली’ या मालिकेत एका सावळ्या मुलीची कथा दाखवण्यात येणार आहे. या मुलीचा आवाज अतिशय गोड आहे. पण तिचा आवाज कदाचित ओढावलेल्या परिस्थितीमुळे एका श्रीमंत कुटुंबाकडे गहाण ठेवण्यात आला आहे. त्यामुळे या सावळ्या मुलीला सर्वांसमोर गाणे गाता येत नाही. तिचा आवाज दुसऱ्या एका श्रीमंत घरातील मुलीला देण्यात येतो. या गरीब आणि सावळ्या मुलीचे सत्य सर्वांसमोर येणार का? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.
वाचा: बॉलिवूडमधील सर्वात मोठा फ्लॉप सिनेमा यूट्यूबवर प्रदर्शित! बजेट ४५ कोटी आणि कमाई ०.०१ कोटी
‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेचा प्रोमो प्रदर्शित होताच सोशल मीडियावर ट्रोल होत आहे. एका नेटकऱ्याने 'गोरी मुलगी घ्यायची मग तिला सावळी करायचे' अशी कमेंट केली आहे. तर दुसऱ्या एका यूजरने 'रंग माझा वेगळा लिटिल व्हर्जन' असे म्हणत तुलना केली आहे. तिसऱ्या एका यूजरने 'तुम्ही आता मालिकांमध्ये हे हिरोईनचा काळा मेकअप करणे थांबवायला हवे' असे स्पष्ट मत मांडले आहे. चौथ्या एका यूजरने 'परत रंग माझा वेगळा' असे म्हटले आहे. आता ही नवी मालिका कधी प्रदर्शित होणार? त्यामध्ये नेमकी काय कथा असणार? हे पाहण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.