गेल्या काही दिवसांपासून दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेता नागार्जुन आणि त्याची दोन्ही मुले चर्चेत आहेत. नागार्जुनचा मोठा मुलगा नागा चैतन्यने पहिल्या पत्नीला घटस्फोट देऊन शोभिता धुलिपालाशी साखरपुडा केला. त्याच्या लग्नाची सध्या जोरदार तयारी सुरु आहे. त्यापाठोपाठ नागार्जुनचा धाकटा मुलगा अखिल देखील दुसरे लग्न करणार असल्याची माहिती समोर आली आहे. स्वत: नागार्जुनने याविषयी माहिती दिली आहे.
अक्किनेनी कुटुंबाने अनेक सुंदर छायाचित्रांसह अखिल अक्किनेनी आणि जैनब रावदजीयांच्या साखरपुड्याची घोषणा केली. नागार्जुनने एका निवेदनात म्हटले आहे की, हितचिंतकांना हे सांगताना कुटुंबाला खूप आनंद होत आहे. लग्नाच्या तारखा अद्याप निश्चित झालेल्या नाहीत. पण पुढील वर्षी लग्न होण्याची शक्यता आहे.
'द न्यू इंडियन एक्स्प्रेस'ने दिलेल्या वृत्तानुसार, जैनब ही मुंबईत राहणारी कलाकार आणि कला प्रदर्शनकार आहे. पण तिचा जन्म हैदराबादमध्ये झाला आहे. जैनब ही उद्योगपती झुल्फी रावदजी यांची मुलगी आहे. बांधकाम उद्योगात ते अग्रेसर आहेत. जैनब यांचे बंधू जैन रावदजी झेडआर रिन्यूएबल एनर्जी प्रायव्हेट लिमिटेडचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक आहेत. ती एक कुशल कलाकार आहे. ती तिच्या अमूर्त आणि प्रभाववादी चित्रे व प्रदर्शनांसाठी ओळखली जाते. जैनब ही ३९ वर्षांची आहे.
जैनब आणि अखिल काही वर्षांपूर्वी भेटले. सुरुवातीला त्यांच्यामध्ये मैत्रिचे नाते होते. नंतर हळूहळू त्यांनी एकमेकांना डेट करायला सुरुवात केली. आता अखिलने त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर जैनबसोबतचे फोटो शेअर करत साखरपुड्याची घोषणा केली आहे. हे फोटो शेअर करत त्याने, "मला कायमचे सापडले. जैनब रावदजी आणि मी आनंदाने साखरपुडा करत आहोत हे जाहीर करताना आनंद होत आहे" असे कॅप्शन दिले आहे.
दरम्यान, नागार्जुन म्हणाला की, "एक पिता म्हणून अखिलने जैनबसोबत त्याच्या आयुष्यातील हे महत्त्वपूर्ण पाऊल उचलल्याचे पाहून मला खूप आनंद होत आहे. जैनबची कृपा, आपुलकी आणि कलात्मक भावनेमुळे खरोखरच आमच्या कुटुंबात एक अद्भुत भर पडली आहे. आम्ही खूप आनंदी आहोत आणि दोन्ही कुटुंबांसह हा नवीन प्रवास साजरा करण्यास उत्सुक आहोत."
वाचा: मुलीच्या मृत्यूने खचल्या होत्या अनुराधा पौडवाल, स्वप्नात झाला कालीमातेचा साक्षात्कार आणि...
अखिलच्या कामाविषयी बोलायचे झाले तर त्याने आजवर अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमध्ये त्याचा एक वेगळा चाहता वर्ग आहे. २०२३मध्ये त्याचा एजंट हा चित्रपट प्रदर्शित झाला होता.