Marathi Serial TRP Report Week 34 Top 5 List: मराठी मालिका विश्वात सध्या चांगलीच खळबळ उडाली आहे. गेल्या काही महिन्यांत सुरू झालेल्या नव्या मालिका आता बंद होण्याच्या मार्गावर आहेत. यातील काही मालिकांनी प्रेक्षकांचा निरोप देखील घेतला आहे. यामुळे आता कोणत्या मालिका प्रेक्षकांचं मन जिंकून घेण्यात यशस्वी ठरणार आहेत, याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. नुकताच या आठवड्याचा मराठी मालिकांचा टीआरपी रिपोर्ट समोर आला आहे. यावेळी सगळ्याच मालिकांचे रेटिंग काहीसे घसरलेले दिसत आहे. एकंदरीत थोड्याफार फरकाने यावेळी सगळ्याच मालिकांना फटका बसला आहे. चला तर बघूया ३४व्या आठवड्यात कोणत्या मराठी मालिकांनी बाजी मारली आहे.
‘ठरलं तर मग’ ही मालिका आपला पहिला नंबर टिकवून राहिली आहे. गेल्या अनेक आठवड्यांपासून ही मालिका आपलं स्थान कायम ठेवून आहे. या मालिकेत रोजच काहीना काही धमाकेदार ट्वीस्ट पाहायला मिळत आहेत. या मालिकेला ३४व्या आठवड्यात ६.७ टीआरपी रेटिंग मिळाले आहे. या मालिकेत सध्या सायली जिन्यावरून खाली पडल्यामुळे बेशुद्ध अवस्थेत आहे. तर, अर्जुन आपल्या पत्नीला परत येण्याची विनंती करत आहे. आपण सायलीशिवाय राहूच शकत नाही, असं अर्जुनने कबूल केलं आहे. त्यामुळे आता प्रियाचा जळफळाट होणार आहे.
‘थोडं तुझं आणि थोडं माझं’ या मालिकेने देखील अल्पावधीतच प्रेक्षकांची मने जिंकून घेतली आहेत. या मालिकेत अभिनेत्री शिवानी सुर्वे आणि अभिनेता समीर परांजपे ही जोडी मुख्य भूमिकेत दिसत आहे. या मालिकेला ३४व्या आठवड्यात ६.५ रेटिंग मिळाले आहे. या मालिकेत आता तेजस मानसीला आपल्या घरी घेऊन येणार आहे. मानसीच्या वडिलांचं निधन झाल्यापासून तिच्या कुटुंबावर अतिशय वाईट वेळ ओढवली आहे. आता तेजस मानसीला मदत करणार आहे.
‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ या मालिकेत देखील सध्या धमाकेदार कथानक पाहायला मिळत आहे. या मालिकेला ३४व्या आठवड्यात ६.३ टीआरपी रेटिंग मिळाले आहे. या मालिकेत सध्या कला आणि अद्वैत यांची मनं जुळताना दिसणार आहे. दोघे आता खऱ्या अर्थाने एकमेकांचे मित्र बनणार आहेत. कला सध्या अडचणीत सापडली आहे. आता अद्वैत तिला मदत करणार आहे.
तेजश्री प्रधान हिच्या ‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेचा टीआरपी सध्या घसरताना दिसत आहे. मात्र, तरीही ही मालिका टॉप ५मध्ये आपली जागा टिकवून राहिली आहे. या मालिकेला ३४व्या आठवड्यात ६.२ टीआरपी रेटिंग मिळाले आहे. या मालिकेत साध्य सावनीने मुक्ता आणि सागर यांच्या घरात ठाण मांडले आहे. आदित्यचा आधार घेऊन आता सावनी सागरच्या घरावर मालकी हक्क गाजवण्याचा प्रयत्न करणार आहे.
‘घरोघरी मातीच्या चुली’ या मालिकेला मागे टाकून आता ‘येड लागलं प्रेमाचं’ या मालिकेने टॉप ५ मालिकांमध्ये स्थान मिळवले आहे. या मालिकेला आता प्रेक्षकांची पसंती मिळू लागली आहे. या मालिकेला ३४व्या आठवड्यात ५.५ टीआरपी रेटिंग मिळाले आहे. या मालिकेला पाचवं स्थान मिळालं असून सध्या कथानक देखील रंजक वळणावर आलं आहे.