या वर्षाच्या अकराव्या आठवड्यातील मराठी मालिकांचा टीआरपी रिपोर्ट समोर आला आहे. मराठी मालिकांच्या टीआरपी रिपोर्टमध्ये पुन्हा एकदा या आठवड्यातील बहुचर्चित मालिकांचा गवगवा पाहायला मिळाला आहे. सध्या वेगवेगळे ट्वीस्ट आणि रंजक कथानक घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत असलेल्या मालिकांनी ‘टॉप ५’मध्ये आपलं स्थान टिकवून ठेवलं आहे. चला तर, बघूया या आठवड्याच्या टीआरपी रिपोर्टमध्ये कोणत्या मालिकांनी आपली जागा मिळवली आहे...
‘ठरलं तर मग’ ही मालिका गेल्या काही महिन्यांपासून आपलं नंबर वन स्थान टिकून राहिली आहे. सायली आणि अर्जुन यांच्या आयुष्याची एक हटके कथा दाखवणारी ही मालिका प्रेक्षकांच्या पसंती उतरली आहे. सध्या या मालिकेत सायलीचा किडनॅपिंग झालं होतं. मात्र, अर्जुनने तिला गुंडांच्या तावडीतून सुखरूप सोडवलं आहे. आता लवकरच त्यांची हळूहळू फुलणारी प्रेम कहाणी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या आठवड्यात ६.८ टीआरपी मिळवत या मालिकेने पहिले स्थान पटकावले आहे.
‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेत आता मुक्ता आणि सागर यांच्यातील जवळीत वाढताना दिसणार आहे. एकीकडे मुक्ता सागरच्या मुलांना आपलंसं करून, मुलांना पुन्हा एकदा त्यांच्या बाबांचे प्रेम मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत आहे. तर, या मुलांना आपल्या बाबांचे प्रेम मिळाल्यावर, मुक्ता देखील त्यांना आपलीशी वाटू लागणार आहे. थोडसं कौटुंबिक असलेले हे कथानक प्रेक्षकांना भावलं आहे. ६.७चा टीआरपी मिळवत या मालिकेने दुसरं स्थान पटकावले आहे.
‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ या मालिकेत आता नैनाच्या पळून जाण्यात आपली काही चूक नव्हती हे पुराव्यानिशी कला सिद्ध करणार आहे. आता तरी कलाच्या बोलण्यावर अद्वैत विश्वास ठेवू शकेल का आणि तो राहुल काय शिक्षा देईल, हे मालिकेच्या कथानकात पाहायला मिळणार आहे. ६.५चे रेटिंग मिळवत या मालिकेने तिसरे स्थान पटकावले आहे.
‘तुझेच मी गीत गात आहे’ या मालिकेत आता वैदही आणि मंजुळा यांच्यातील तिढा सुटणार आहे. त्यासोबतच मोनिका पीहू ही मल्हारची नाही, तर शुभंकरची मुलगी असल्याचा देखील खुलासा करणार आहे. या मालिकेने ६.५चे रेटिंग मिळवून चौथे स्थान पटकावले आहे.
‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेत आता शालिनीसमोर जयदीपचं सत्य उघड होणार आहे. जयदीपसारख्याच दिसणाऱ्या अर्थात जयदीपचाच पुनर्जन्म असणारा अधिराज आता शालिनीसमोर येणार आहे. तर, जयदीप जिवंत कसा राहिला या विचारानं शालिनीच्या पायाखालची जमीन सरकणार आहे. गौरी आणि जयदीपने एकत्र येऊ नये, म्हणून पुन्हा एकदा शालिनी नवा डाव रचणार आहे. ५.९चा टीआरपी मिळवत या मालिकेने आठवड्यात पाचवे स्थान पटकावले आहे.