Marathi Serial TRP List Week 8: मराठी मालिका विश्वात सध्या वेगवेगळ्या कथानकांनी चांगलाच धुमाकूळ घातला आहे. अनेक नव्या मालिकांनी मनोरंजन विश्वात एन्ट्री घेतली असली, तरी प्रेक्षकांच्या मनावर मात्र जुन्याच मालिकांनी गारुड घातलं आहे. नुकताच आठवडाभराचा टीआरपी रिपोर्ट समोर आला आहे. या रिपोर्टमध्ये कोणकोणत्या मालिकांनी ‘टॉप ५’मध्ये स्थान मिळवले त्याचा लेखाजोखा आहे. चला तर बघूया या आठवड्यात कोणकोणत्या मालिकांनी टीआरपीमध्ये स्थान मिळवलं आहे...
सायली आणि अर्जुन यांच्या नात्यात आता प्रेमाचे अंकुर रुजत आहे. सायलीने अर्जुनच्या दिशेने आता मैत्रीचा हात पुढे केला आहे. समोर येणाऱ्या प्रत्येक संकटाला आता ते धीराने आणि एकत्र मिळून सामोरे जात आहेत. त्यांच्यातील नातं आता खुलंत चाललं आहे. या कथानकामुळेच आता मालिकेला प्रेक्षकांचा देखील चांगला प्रतिसाद मिळत आहे. या मालिकेने टीआरपीच्या शर्यतीत पहिला नंबर पटकावला आहे. या मालिकेला ६.८चे रेटिंग मिळाले आहे.
मुक्ता आणि सागर यांच्यातही आता प्रेमाचा अंकुर फुलू लागला आहे. सईच्या कस्टडी प्रकरणात मुक्ताने केलेली मदत पाहून सागर आता तिला कुटुंबातील व्यक्तीचा दर्जा देऊ लागला आहे. तर, तिच्यावर विश्वास दाखवून त्याने मुक्ताला आणखी एका आरोपातून वाचवले आहे. या मालिकेने टीआरपी शर्यतीत दुसरे स्थान पटकावले आहे. ‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेला ६.७चा टीआरपी मिळाला आहे.
‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’या मालिकेत अद्वैत आणि कला यांच्या लग्नामुळे कथानकाला एक वेगळे वळण मिळाले आहे. दोघांचा लग्न सोहळा नुकताच पार पडला आहे. या लग्नामुळे मालिकेच्या कथानकात चांगलाच गदारोळ पाहायला मिळणार आहे. ही मालिका या आठवड्यात तिसऱ्या स्थानावर आहे. ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ या मालिकेला ६.५चा टीआरपी मिळाला आहे.
‘तुझेच मी गीत गात आहे’या मालिकेने टीआरपी शर्यतीत चौथे स्थान पटकावले आहे. या मालिकेच्या नव्या भागांनी प्रेक्षकांना मालिकेच्या कथानकात गुंतवून ठेवले आहे. शुभंकरने या मालिकेत पुन्हा एन्ट्री घेऊन मोनिकाचं सत्य सगळ्यांसमोर आणण्याचा निर्णय घेतला आहे. ‘तुझेच मी गीत गात आहे’ या मालिकेला ६.४चा टीआरपी मिळाला आहे.
‘सुखं म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेत अधिराज आणि नित्या यांना त्यांचा पुनर्जन्म आठवू लागला आहे. गेल्या जन्मात अधुरी राहिलेली जयदीप आणि गौरीची ही प्रेम कहाणी या जन्मात पूर्ण करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. अधिराज आता सगळ्या गावासमोर आपलं नित्यावर प्रेम असल्याचं आणि लग्न करणार असल्याचं जाहीर करणार आहे. या आठवड्यात‘सुखं म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेने पाचवे स्थान पटकावले आहे.‘सुखं म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेला ५.९चा टीआरपी मिळाला आहे.