सगळ्यांचे लक्ष लागून राहिलेला मराठी मालिकांचा या आठवड्याचा म्हणजेच २०व्या आठवड्याचा टीआरपी रिपोर्ट नुकताच समोर आला आहे. या आठवड्याच्या टीआरपी रिपोर्टमध्ये पहिल्या नंबर वर पुन्हा एकदा ‘ठरलं तर मग’ या मालिकेचं नाव पाहायला मिळालं आहे. ‘ठरलं तर मग’ ही मालिका गेल्या काही आठवड्यांपासून सतत आपला पहिला नंबर टिकवून आहे. तर, या आठवड्याच्या मालिकांमध्ये नव्याने आलेल्या एका मालिकेची देखील वर्णी लागली आहे. चला तर, पाहूया या आठवड्याच्या टॉप ५ मराठी मालिका आणि त्यांचे टीआरपी रेटिंग...
२०२४च्या २०व्या आठवड्यात पुन्हा एकदा ‘ठरलं तर मग’ या मालिने पहिला नंबर पटकावला आहे. या मालिकेला ६.७चा टीआरपी रेटिंग मिळाला असून मालिकेने प्रेक्षकांचं मन जिंकून घेतलं आहे. या मालिकेत सध्या सायली आणि अर्जुन यांच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचा वेळ संपत आल्याचे दाखवण्यात आले आहे. कॉन्ट्रॅक्ट संपल्यामुळे सायली आणि अर्जुन यांना आता एकमेकांपासून वेगळं व्हावं लागणार आहे. मात्र, याच दरम्यान मालिकेतील ट्वीस्ट येणार आहे.
‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ या मालिकेने टीआरपी शर्यतीत दुसरा क्रमांक पटकावला आहे. गेल्या काही आठवड्यांपासून ही मालिका प्रेक्षकांचा मन जिंकत असून, आपलं दुसरं स्थान टिकून राहिली आहे. या आठवड्यात या मालिकेने ६.४चा टीआरपी मिळवत बाजी मारली आहे. या मालिकेत सध्या कला आणि अद्वैत यांच्यातील लुटुपुटूचे भांडण पाहायला मिळत आहे. या दरम्यान दोघेही मनाने एकमेकांच्या जवळ येत आहेत. लवकरच त्यांची प्रेमकथा पाहायला मिळणार आहे.
‘तुझेच मी गीत गात आहे’ या मालिकेत सध्या बरेच ट्विस्ट बघायला मिळत आहेत. या मालिकेने प्रेक्षकांना चांगलाच मनोरंजनाचा डोस दिला आहे. टीआरपी शर्यतीत चौथ्या किंवा पाचव्या स्थानावर असणाऱ्या या मालिकेने यंदा मात्र तिसरं स्थान पटकावलं आहे. ६.२चं रेटिंग मिळवत ही मालिका टीआरपीच्या शर्यतीत एक पाऊल पुढे गेली आहे. सध्या स्वरा आपल्या आईला म्हणजे वैदहीला शोधून मोनिकाचं सत्य समोर आणण्याचा प्रयत्न करताना दिसतेय.
‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेने या आठवड्यात ६.२चा टीआरपी मिळवत चौथे स्थान पटकावले आहे. ही मालिका दिवसेंदिवस मागे सरकताना दिसत आहे. सुरुवातीला दुसऱ्या स्थानावर असलेली ही मालिका आता चौथ्या स्थानावर घसरली आहे. मालिकेचे कथा नाव संथ गतीने चालू असल्याचं प्रेक्षकांचं म्हणणं आहे. या मालिकेचं कथानक सध्या मुक्ताच्या आईच्या अपघाताभोवती फिरतंय. सागरचा मुलगा आदित्य यांने गाडी चालवून, तिला उडवलं आहे. मात्र मुक्ताला याची कल्पना नाही. लवकरच सगळ्यांसमोर सगळं सत्य बाहेर येणार आहे.
‘घरोघरी मातीच्या चुली’ ही मालिका नव्यानेच छोट्या पडद्यावर दाखल झाली आहे. मात्र अल्पावधीतच या मालिकेने प्रेक्षकांचं मन जिंकून घेतलं आहे. या मालिकेतील जानकी आणि ऋषिकेश यांची जोडी प्रेक्षकांना आवडत आहे. ५.४चा टीआरपी मिळवून या मालिकेने पाचवे स्थान पटकावले आहे. सध्या मालिकेत ऐश्वर्या आणि सारंग यांचा लग्न सोहळा पाहायला मिळाला होता. मात्र, ऐश्वर्याने सौमित्रला किडनॅप केल्याचे जानकीच्या समोर आले आहे. आता जानकी ऐश्वर्याच्या प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेवून आहे.
संबंधित बातम्या