छोट्या पडद्यावर गाजणाऱ्या मालिका सध्या प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेण्यात यशस्वी ठरत आहेत. अनेक मालिका नव्याने छोट्या पडद्यावर दाखल झाल्या आहेत. मात्र, अनेक मालिका नव्याने दाखल झाल्या असल्या, तरी जुन्या मालिका आपला दबदबा कायम ठेवला आहे. नुकताच १६व्या आठवड्याचा टीआरपी रिपोर्ट समोर आला आहे. या रिपोर्टमध्ये सोळाव्या आठवड्यात बाजी मारणाऱ्या मालिकांची यादी आहे. चला तर, पाहूया या आठवड्यात कुठल्या मालिकांनी प्रेक्षकांचं मन जिंकून घेतलं.
नेहमीप्रमाणे ‘ठरलं तर मग’ आपला पहिला नंबर राखून ठेवला आहे. सायली आणि अर्जुनच्या आयुष्यातील प्रेमाची ही गोष्ट आता प्रेक्षकांना आवडू लागली आहे. नुकतंच सायलीने अर्जुनवरील प्रेमाची कबुली दिली आहे. त्यामुळे आता मालिकेच्या येत्या भागांमध्ये सायली आणि अर्जुनच्या नात्यात प्रेम फुलताना पाहायला मिळणार आहे
‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ या मालिकेने तेजश्री प्रधानच्या ‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेला धोबीपछाड करत दुसरा नंबर पटकावला आहे. टीआरपीच्या शर्यतीत अल्पावधीतच या मालिकेने अग्रक्रम मिळवला आहे. या मालिकेत सध्या कला आणि अद्वैत यांच्या आयुष्यात चाललेला गडबड गोंधळ प्रेक्षकांना पाहायला चांगलाच आवडतो आहे
‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेत तेजश्री प्रधान ही मुख्य भूमिका साकारत आहे. तिने साकारलेल्या मुक्ताला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. मात्र, गेल्या काही आठवड्यांपासून या मालिकेचा टीआरपी काहीसा घसरताना दिसतोय. या आठवड्यात ही मालिका तिसऱ्या स्थानावर आहे. तर, मालिकेच्या कथानकात सध्या मुक्ता आणि सागर यांच्या नात्यात काहीसा दुरावा आलेला पाहायला मिळत आहे.
‘तुझेच मी गीत गात आहे’ या मालिकेने टीआरपी शर्यतीत पुन्हा बाजी मारली आहे. गेल्या काही काळापासून टीआरपी शर्यतीतून बाहेर पडलेली ही मालिका पुन्हा एकदा दणक्यात परतली आहे. सध्या वैदही आणि मोनिका यांच्यातील वैर एका वेगळ्याच थराला गेलेले पाहायला मिळत आहे. मल्हारच्या आयुष्यात परत आलेल्या वैदहीला आता थेट यमसदनी पाठवण्याचा प्रयत्न मोनिका करते आहे. ही मालिका सध्या चौथ्या स्थानावर आहे.
‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेने टीआरपी शर्यतीत आपलं पाचवं स्थान कायम ठेवलं आहे. या मालिकेत नित्या आणि अधिराज यांच्या लग्नाची धामधूम सध्या पाहायला मिळणार आहे. नित्या आणि अधिराज म्हणजेच मागच्या जन्मीचे गौरी आणि जयदीप या जन्मात शालिनीचा बदला घेण्याचा पूर्ण प्रयत्न करणार आहेत. मात्र, जयदीपला अजूनही त्याच्या पुनर्जन्माच्या काही आठवणी स्पष्ट झालेल्या नाहीत. त्यामुळे तो नित्याला स्वीकारायला अजूनही नकार देत आहे.