Marathi Natak Shri Shivaji Mandir: सध्या चित्रपटसृष्टीप्रमाणेच रंगभूमीवर देखील अनेक प्रयोग होत आहेत. अनेक नवी मराठी नाटकं प्रेक्षकांच्या भेटीला येत असताना काही अफवांनी देखील जोर धरला होता. मराठी नाटकांसाठी महत्त्वपूर्ण असलेला रंगमंच अर्थात 'श्री शिवाजी मंदिर' नाट्यगृहाबद्दल सध्या काही चर्चा सुरू होत्या. या चर्चांना पूर्णविराम देण्यासाठी आता मराठी नाट्य व्यावसायिक निर्माता संघाने निवेदन जारी केलं आहे. यात त्यांनी आपला खुलासा केला आहे.
गेल्या काही दिवसांपासून जाहिरातीतून आणि काही बातम्यांमधून 'श्री शिवाजी मंदिर-दादर' येथे १ जानेवारीपासून नाट्यप्रयोग होणार नाही, असे प्रसिद्ध होत आहे. त्यासोबत नाटकांची नावेही दिली जात आहेत. 'शिवाजी मंदिर नाट्यगृहावर निर्मात्यांचा बहिष्कार', अशा शीर्षकाची बातमीही प्रकाशित झाली आहे. हे वृत्त चुकीचे असल्याचे ज्येष्ठ निर्माते व मराठी नाट्य व्यावसायिक निर्माता संघ, मुंबईचे अध्यक्ष संतोष काणेकर आणि प्रमुख कार्यवाह राहुल भंडारे यांनी पत्रकाद्वारे जाहीर केले आहे.
मराठी नाट्य व्यावसायिक निर्माता संघ, मुंबई ही नाट्य निर्मात्यांच्या व्यवसायातील समस्या योग्य ठिकाणी मांडून दूर करणारी, ५५ वर्षे जुनी नोंदणीकृत नाट्य निर्मात्यांची संस्था आहे. सध्या या संस्थेचे ४५ नाट्य निर्माते सभासद आहेत. यापैकी कोणीही श्री शिवाजी मंदिर बाबत बहिष्काराचे पाऊल उचलले नाही, अशी माहिती देऊन संतोष काणेकर म्हणाले की, 'काही निर्मात्यांनी तसा निर्णय घेतला असेल, तर त्यांचे वेगळे प्रश्न असू शकतील. ते त्यांनी 'श्री शिवाजी मंदिर'च्या संचालक मंडळाकडे मांडले पाहिजे होते. या संचालक मंडळाकडून योग्य मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद मिळतो, असा नाट्य निर्मात्यांचा आजवरचा अनुभव आहे. अलीकडेच आमच्या संघटनेने केलेल्या मागणीनुसार, 'श्री शिवाजी मंदिर' संचालक मंडळाने ५०० रुपये तिकिटासाठीचे दुप्पट भाडे (जे महापालिकेच्या नाट्यगृह भाड्यापेक्षा कमी होते;) ते कमी करून दीडपट केले आहे. तसेच, संगीत व प्रायोगिक नाटकांसाठी नाट्यगृहाचे भाडे २५% कमी केले आहे. तारीख वाटपातही सुसूत्रता आणि पारदर्शकता आणली आहे. ती नाट्य व्यवसायातील हेराफेरीला चाप लावणारी आहे.'
'या वस्तुस्थितीच्या विपरीत जाहिरात वा बातम्या आल्यास ते नाट्य व्यवसायाला मारक आणि प्रेक्षकांची दिशाभूल करणारे होईल. तसे होऊ नये, याकरिता 'श्री शिवाजी मंदिर नाट्यगृहात १ जानेवारीनंतरही नाटकाचे प्रयोग सुरूच राहतील', असे मराठी नाट्य व्यावसायिक निर्माता संघ, मुंबईचे प्रमुख कार्यवाह राहुल भंडारे यांनी सांगितले आहे.
संबंधित बातम्या