Satyashodhak movie: सध्या मराठी चित्रपटांना सुगीचे दिवस आल्याचे पाहायला मिळत आहे. एकापाठोपाठ एक असे वेगवेगळ्या विषयांवर आधारित चित्रपट मराठी सिनेसृष्टीमध्ये प्रदर्शित होताना दिसतात. काही दिवसांपूर्वी ‘सत्यशोधक’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटासोबतच बॉलिवूडमधील काही चित्रपट प्रदर्शित झाले. या चित्रपटांना ‘सत्यशोधक’ सिनेमाने टक्कर दिली आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाला पाच आठवडे झाले आहेत. तरीही चित्रपट सिनेमागृहात तग धरुन आहे. ही खरच कौतुकाची बाब आहे.
‘सत्यशोधक’ हा सिनेमा समस्त स्त्री वर्गाला शिक्षणाचा योग्य मार्ग दाखवणारे आणि संघर्ष, विरोध पत्करून प्रत्येक स्त्री शिकलीच पाहिजे असा आग्रह धरून स्वतः या शिक्षणाच्या यज्ञकुंडात उतरलेले महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित आहे. ‘सत्यशोधक’ हा चित्रपट प्रदर्शित होताच हाऊसफुलच्या रांगेत जाऊन बसला होता आणि कौतुकाची बाब म्हणजे आता या चित्रपटाचा थेट पाचवा आठवडा सुरू झाला आहे.
वाचा: आशुतोष मनू सांगणार का मायाचे सत्य? काय घडणार आजच्या भागात?
‘सत्यशोधक’ चित्रपटाच्या ट्रेलर, टीझर आणि लूक रिव्हीलमुळे आधीच या चित्रपटाची जोरदार चर्चा झाली होती. महापुरूषांचा इतिहास आपल्या लहान मुलांना कळावा यासाठी अनेक प्रेक्षक आपल्या पाल्यांसह या चित्रपटाला येत आहेत. तसेच टॅक्स फ्री झाल्याने प्रेक्षकांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाची ओळख जागतिक पातळीवर झाली आहे. न्यूझीलंडची राजधानी वेलिंग्टन आणि ऑस्ट्रेलियामध्ये मेलबर्न येथे रेड कार्पेट प्रीमियर सोहळा फेब्रुवारी आणि मार्चमध्ये होणार आहे. त्यामुळे परदेशातही हा चित्रपट प्रदर्शित होईल.
महात्मा फुलेंच्या भूमिकेतील अभिनेते संदीप कुलकर्णी आणि सावित्रीबाई फुलेंच्या भूमिकेतील अभिनेत्री राजश्री देशपांडे यांचे विशेष कौतुक होत आहे. संदीप-राजश्री यांच्यासह गणेश यादव, सुरेश विश्वकर्मा, रविंद्र मंकणी ही कलाकार मंडळी चित्रपटात झळकतील. ज्येष्ठ कादंबरीकार विश्वास पाटील यांच्या हस्ते चित्रपटाच्या ट्रेलरचे अनावरण करण्यात होते. निलेश जळमकर लिखित-दिग्दर्शित, संकल्पना - राहुल तायडे, वैशाख वाहुरवाघ सत्यशोधक चित्रपटाचे निर्माते प्रविण तायडे, आप्पा बोराटे, भिमराव पट्टेबहादूर, सुनील शेळके, विशाल वाहूरवाघ हे आहेत.