Marathi Filmy Nostalgia: सध्या सगळीकडे आनंद आणि जल्लोषाचं वातावरण आहे. कारणही अगदी तसंच आहे. सध्या सगळीकडे बाप्पाच्या आगमनाने वातावरण अगदी जल्लोषाने भरून गेलं आहे. सगळीकडेच बाप्पाची गाणी ऐकू येत आहेत. यातच सतत कानावर पडणारं एक गाणं म्हणजे ‘अष्टविनायका तुझा महिमा कसा...’. मराठीत गाजलेल्या ‘अष्टविनायक’ या चित्रपटातील हे गाणे आजही तितकेच लोकप्रिय आहे. या गाण्यामागचा किस्सा देखील अतिशय भन्नाट आहे. अवघ्या एका दिवसांत हे १३ मिनिटांचं गाणं लिहून आणि रेकॉर्ड करून तयार झालं होतं. अर्थात ही सगळी किमया होती गीतकार जगदीश खेबुडकर यांची...
‘अष्टविनायक’ हा चित्रपट शरद पिळगावकर यांनी तयार केला होता. ‘अष्टविनायक’ हा चित्रपट तयार होताना निर्मात्यांना देखील अनेक अडचणींना सामोरे जावे लागले होते. सुरुवातीला या चित्रपटात काम करणाऱ्या मुख्य अभिनेत्याने अर्ध्यातूनच माघार घेतली होती. तर, अभिनेत्रीच्या नावावर देखील बराचवेळ गोंधळ सुरू होता. अखेर या चित्रपटासाठी अभिनेता म्हणून सचिन पिळगावकर यांची निवड करण्यात आली. सचिन पिळगावकर यांच्या वडिलांनी म्हणजेच शरद पिळगावकर यांनी हा चित्रपट तयार केला होता. सचिन पिळगावकर यांच्यासोबत अभिनेत्री वंदना पंडित यांची नावावर शिक्कामोर्तब झालं.
आता प्रश्न होता या चित्रपटातील एका महत्त्वाच्या गाण्याचा. आधीच या चित्रपटातील २ गाणी रेकॉर्ड करण्यात आली होती. मात्र, क्लायमॅक्ससाठी हवं असलेलं ‘अष्टविनायका’चा महिमा सांगणारं गाणं अद्याप बाकी होतं. आता या गण्यासाठी हातात फारसा वेळ देखील नव्हता. अशावेळी शरद पिळगावकर यांना एक नाव आठवलं ते म्हणजे जगदीश खेबुडकर. शरद पिळगावकर रात्री तातडीने जगदीश खेबुडकर यांच्या घरी पोहोचले आणि त्यांना हे गाणं लिहिण्यास सांगितले. मात्र, त्यावेळी जगदीश खेबुडकर चांगलेच पेचात पडले होते.
याचं महत्त्वाचं कारण म्हणजे जगदीश खेबुडकर यांनी अष्टविनायकांपैकी एकही गणपती प्रत्यक्षात पाहिला नव्हता. त्यामुळे गणपतीचा महिमा लिहावा तरी कसा असा प्रश्न त्यांच्यासमोर होता. त्यावेळी शरद यांनी त्यांच्या हातात एक अष्टविनायक गणपतींची सगळी माहिती असणारे एक पुस्तक टेकवले. ते वाचून अवघ्या एका रात्रीत जगदीश खेबुडकरांनी गणपती बाप्पाचा महिमा अक्षरशः तिथे जाऊन वर्णन करावा, अशाप्रकारे कागदावर उतरवला. इतकंच नाही तर, दुसऱ्या दिवशीच त्यांनी स्वतःच्याच आवाजात हे गाणे रेकॉर्ड केले. आजही हे गाणे तुफान लोकप्रिय आहे.