मराठी चित्रपटांनाही पायरसीचा फटका! ‘अलीबाबा आणि चाळीशीतले चोर’च्या निर्मात्यांकडून प्रेक्षकांना आवाहन-marathi films also affected by piracy the makers of alibaba ani chalishitale chor appeal to audience after complaint ,मनोरंजन बातम्या
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  मराठी चित्रपटांनाही पायरसीचा फटका! ‘अलीबाबा आणि चाळीशीतले चोर’च्या निर्मात्यांकडून प्रेक्षकांना आवाहन

मराठी चित्रपटांनाही पायरसीचा फटका! ‘अलीबाबा आणि चाळीशीतले चोर’च्या निर्मात्यांकडून प्रेक्षकांना आवाहन

Apr 07, 2024 12:37 PM IST

नुकताच ‘अलीबाबा आणि चाळीशीतील चोर’ हा मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. हा चित्रपट रिलीज झाला, त्याच्या दुसऱ्याच दिवशी याची पायरटेड कॉपी अनेक वेबसाईटवर धुमाकूळ घालू लागली.

मराठी चित्रपटांनाही पायरसीचा फटका! ‘अलीबाबा आणि चाळीशीतले चोर’च्या निर्मात्यांकडून प्रेक्षकांना आवाहन
मराठी चित्रपटांनाही पायरसीचा फटका! ‘अलीबाबा आणि चाळीशीतले चोर’च्या निर्मात्यांकडून प्रेक्षकांना आवाहन

बॉलिवूड असो, हॉलिवुड असो, मराठी असो किंवा इतर कुठलीही मनोरंजन सृष्टी प्रत्येक चित्रपटाला पायरसीचं ग्रहण लागलं आहे. एखादा चित्रपट चित्रपटगृहात रिलीज झाला की, त्याच दिवशी किंवा त्याच्या दुसऱ्या दिवशी तो सहज मोबाईलवर डाऊनलोड करता येतो. इंटरनेटवर अशा अनेक वेबसाईट आहेत, ज्यावर अशा चित्रपटांच्या पायरेटेड कॉपीज आपल्याला सहज पाहायला मिळतात. मात्र, या पायरसीमुळे चित्रपटाला मोठा फटका बसतो. एक चित्रपट बनवण्यासाठी एका व्यक्तीची नव्हे, तर एका मोठ्या टीमची मेहनत असते. चित्रपट प्रेक्षकांनी चित्रपटगृहातच जाऊन बघावेत, असं कलाकार देखील वेळोवेळी म्हणत असतात. मात्र, तरी पायरसी झाल्यावर चित्रपट फुकटात बघण्याच्या मोहाला बळी पडतो.

नुकताच ‘अलीबाबा आणि चाळीशीतील चोर’ हा मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटात सुबोध भावे, मुक्ता बर्वे, उमेश कामत, श्रुती मराठे, आनंद इंगळे, अतुल परचुरे आणि मधुरा वेलणकर यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. हा चित्रपट रिलीज झाला, त्याच्या दुसऱ्याच दिवशी याची पायरटेड कॉपी अनेक वेबसाईटवर धुमाकूळ घालू लागली. याचा फटका चित्रपटाला बसला. घरबसल्या फुकटात चित्रपट बघता येत असल्याने प्रेक्षकही थिएटरकडे फिरकेनाशे झाले. आपल्या चित्रपटाची पायरसी होतेय, हे कळताच निर्मात्यांनी देखील पोलिसांत धाव घेतली होती. या चित्रपटाच्या कलाकारांनी आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना आवाहनही केलं.

Heeramandi Looks: १४ वर्षांनंतर फरदीन खानची मोठ्या पडद्यावर वापसी! ‘हीरामंडी’तील ‘या’ चेहऱ्यांना ओळखलंत का?

पोलिसांची कारवाई सुरू!

आपला ‘अलीबाबा आणि चाळीशीतील चोर’ हा चित्रपट थिएटरमध्ये जाऊन बघावा, असं कलाकारांनी म्हटलं. मात्र, पायरसीचा हा किडा तोपर्यंत अनेक ठिकाणी पसरलेला होता. पोलिसांनी निर्मात्यांची तक्रार दाखल करून घेतल्यानंतर तातडीने कारवाई देखील सुरू केली. या संदर्भात पोलिसांनी पुढे काय कारवाई केली हे जाणून घेण्यासाठी हिंदुस्तान टाइम्स मराठीने निर्मात्यांशी बोलण्याचा प्रयत्न केला. निर्मात्या वैशाली विराज लोंढे यांच्या वतीने विराज लोंढे यांच्याशी झालेल्या संभाषणादरम्यान त्यांनी माहिती देताना सांगितलं की, पोलीस या प्रकरणात त्यांना संपूर्ण सहकार्य करत आहेत. पायरसी रोखण्यासाठी पोलिसांनी योग्य ती कारवाई करत सायबर सेलकडे देखील ही तक्रार दाखल केली आहे.

निर्मात्यांनी प्रेक्षकांना केले आवाहन

यावेळी प्रेक्षकांना आवाहन करताना आणि पायरसीचे तोटे सांगताना विराज लोंढे म्हणाले की, ‘आम्ही नम्रपणे प्रेक्षकांना विनंती करू इच्छितो की, हा चित्रपट आपण थिएटरमध्ये जाऊन आपल्या कुटुंबासोबत एन्जॉय करावा. अशा अनेक पायरसी साईटवरून तुमच्या मोबाईलमध्ये किंवा तुमच्या लॅपटॉपमध्ये व्हायरसचा शिरकाव होण्याची शक्यता असते. याशिवाय तुम्ही या साइटवरून जेव्हा असा कंटेंट डाऊनलोड करता तेव्हा सायबर फ्रॉडचे शिकार देखील होऊ शकता. पायरसी करण्याइतकाच पायरसी केलेला कंटेंट इतर ठिकाणी व्हायरल करणे, हा देखील गुन्हा आहे. त्यामुळे तुमच्या ग्रुपमध्ये किंवा तुमच्या व्हॉट्सअपवर हा चित्रपट आला असेल, तर तो तिथेच डिलीट करणे ही प्रत्येकाची वैयक्तिक जबाबदारी आहे. आपला मराठी प्रेक्षक तितका सुजाण नक्कीच आहे, की तो अशा चुकीच्या कृत्यांना खतपाणी घालणार नाही’, असा विश्वासही निर्मात्यांनी व्यक्त केला आहे.