Marathi Celebrities On potholes: पावसाळा सुरू झाला की, रस्त्यांची अवस्था बघून सगळेच हैराण होतात. या काळात रस्ते अपघातांची संख्या देखील वाढते. गेल्या काही दिवसांपासून अशाच अपघातांच्या बातम्या येत समोर येत आहे. या अपघातांना बहुतांश वेळा खड्डे जबाबदार असतात. खड्ड्यात साचलेल्या पाण्यामुळे खोलीचा देखील अंदाज येत नाही. याच अवस्थेमुळे भयंकर ट्राफिकचाही सामना करावा लागतो. यामुळे कामाला निघालेल्या नोकरदार वर्गाला देखील मनःस्ताप सहन करावा लागतो. कलाकारांना देखील त्यांच्या शूटिंगच्या ठिकाणी पोहोचायला वेळ होतो. यामुळे कलाकार देखील त्रस्त झाले आहेत.
मुंबईत अनेक ठिकाणी आता ऐन पावसाळ्यात रस्त्यांची कामे सुरू केली होती. सामान्य नागरिकांना याबद्दल माहिती दिली गेलेली नाही. प्रशासनाने नागरिकांना याबद्दल माहिती द्यायला हवी होती. त्यामुळे आता नागरिकांचा खोळंबा होताना दिसतोय. या खड्ड्यांमुळे वेळेचं गणितदेखील बिघडतं. खड्ड्यांमुळे लागलेल्या ट्राफिक जाममुळे एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जायला किती वेळ लागेल, याचा अंदाज बांधता येत नाही. नियोजनाच्या अभावामुळे सध्या सगळीकडेच हीच परिस्थिती आहे. पण, प्रशासनाने याबद्दल काळजी घेतली पाहिजे, असे अभिनेता हेमंत ढोमे म्हणाला.
या परिस्थितीवर प्रतिक्रिया देताना अभिनेता शशांक केतकर म्हणाला की, ‘सध्या रस्त्यांवर महागडी गाडी असो, किंवा सायकलवरून प्रवास करणारी व्यक्ती कुणीच सुरक्षित नाहीये. आपल्याला प्रवासासाठी प्रत्येक नागरिकाला खड्डे मुक्त रस्ता मिळावा, ही प्रत्येकाची गरज आणि हक्क आहे. चांगले रस्ते बांधणे, त्याची देखरेख करणे हे प्रशासनाचे काम आहे. माझ्यासह मुंबई उपनगर आणि राज्यभरातील रस्त्यातील खड्ड्यांमुळे होणारा त्रास हा कुणापासूनही लपून राहिलेला नाही. त्यामुळे प्रशासनानं संबंधित सरकारी खात्याच्या कामाकडे दुर्लक्ष करणे म्हणजे नागरिकांच्या जीवाशी खेळ करण्यासारखेच आहे. गेल्याच महिन्यात ठाण्यातल्या घोडबंदर रोडचं काम झालं होतं. मात्र, अवघ्या महिनाभरातच पुन्हा एकदा त्या रस्त्यावर खड्डे दिसत आहे. सगळ्यांना त्यामुळे त्रास होतोय. यावर लवकरात लवकर तोडगा काढायला हवा. तसेच, रस्त्याच्या दुतर्फा लागलेले फलक, फ्लेक्स आणि झेंडे देखील घातक आहेत. त्यामुळे देखील अपघात होण्याची शक्यता असते.’
‘आपल्याकडे सर्वांच्या सोयीसाठी अटल सेतू बांधला गेलाय. त्यामुळे प्रवासाचा वेळ कमी होतो. परंतु, अटल सेतूपर्यंत पोहोचण्यासाठीच फार वेळ खर्च करावा लागतो. नाशिकहून मुंबईला येण्यासाठी साधारण तीन तास लागतात. मात्र, खड्ड्यांमुळे हा प्रवास जवळपास सहा तासांवर गेला. कामावर वेळेत पोहोचण्यासाठी अक्षरश: तारेवरची कसरत करावी लागते. यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आणि अनेकांना आपला जीव गमवावा लागत आहे. सरकार आपल्याकडून अनेक प्रकारचे कर वसूल करते. आपण टोलही भरतो. मग आपल्याला चांगले रस्ते का मिळत नाही? असा प्रश्न मला नेहमी पडतो. प्रवास आणि कामातच सगळा वेळ जात असल्यामुळे घरच्यांना वेळ देता येत नाही आणि प्रवासातच सगळा वेळ वाया जातो’, असं अनिता दाते म्हणाली
संबंधित बातम्या