Abhijeet Sawant Dance on Afghan Jalebi Song: ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाचा उपविजेता ठरलेल्या अभिजीत सावंत सोशल मीडियावर खूप सक्रिय झाला आहे. अभिजीत सावंत गेल्या काही दिवसांपासून सातत्याने सोशल मीडियावर आपले फोटो आणि व्हिडीओ शेअर करत आहेत. नुकताच त्याने बाथरुममध्ये डान्स करतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे, जो वाऱ्याच्या वेगाने सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
अभिजीत सावंतने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केलेल्या व्हिडिओत तो एका बाथरुममध्ये ‘अफगाण जिलेबी’ या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये 'शोच्या आधी अतिउत्साह…आणि बाथरुममध्ये सुंदर दिवे… तर मग नाच, गाणे व्हायलाच पाहिजे', असे लिहिण्यात आले. अभिजीत सावंतचा हा व्हिडिओ त्याच्या चाहत्यांना आवडला आहे. तसेच या व्हिडिओवर चाहत्यांनी गंमतीशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत.
अभिजीत सावंतच्या व्हिडिओवर आपली प्रतिक्रिया देताना एका युजरने म्हटले आहे की, अभिजीतसाठी बिग बॉस पुन्हा बघत आहे. दुसरा युजर म्हणतोय की, अभिलाषा मोड ऑन…खूप छान…आम्हाला तुमची आठवण येतेय.' तिसऱ्या युजरने आग लावली भावा, अशी प्रतिक्रिया दिली आहे. तर, चौथ्या युजरने अभिजीतला अफगाण अभिलाषा असे गंमतीने म्हटले आहे.
अभिजीत सावंत हा इंडियन आयडल रिऍलिटी शोच्या पहिल्या पर्वाचा विजेता आहे. त्याने २००५ मध्ये गायलेले मोहब्बते लुटाऊंगा हे गाणे खूप प्रसिद्ध झाले होते. त्याच्या आपका अभिजीत हा अल्बमलाही मोठी पसंती मिळाली. त्यानंतर २००८ मध्ये त्यांने जो जिता वही सिकंदर या रिऍलिटी शोचेही उपविजेतेपद मिळवले. पुढे २००९ मध्ये त्याने नच बलियेच्या चौथ्या हंगामात आपल्या पत्नीसह सहभाग घेतला होता. दरम्यान, अभिजीतने २००७ मध्ये शिल्पा यांच्यासोबत लग्न केले. त्यांना आता दोन मुले आहेत. शिल्पा यांचा बेकिंगचा व्यवसायही आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अभिजीत सावंत हा बॉलिवूड स्टार शाहरुख खान आणि राणी मुखर्जी यांचा मोठा चाहता आहे. त्याने लॉटरी, तीस मार खान अशा चित्रपटांमध्ये तर, लोकप्रिय शो सीआयडीमध्ये अभिनय केला आहे. ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘मी होणार सुपरस्टार-छोटे उस्ताद ३’ महाअंतिम सोहळ्यात अभिजीत पाहायला मिळणार आहे. शनिवार ९ आणि रविवार १० नोव्हेंबरला रात्री ९ वाजता हा महाअंतिम सोहळा रंगणार आहे.