महाराष्ट्रातील नाट्य रसिकांना रंगभूमीवर वेगवेगळ्या विषयांवर आधारित नाटक पाहायला मिळतात. मग काही कॉमेडी असो, क्राइमवर आधारित असोत किंवा मग बालनाटक असो प्रेक्षक आवार्जुन पाहाताना दिसतात. काही दिवसांपूर्वी एआयचा वापर करुन 'आजीबाई जोरात' हे नाटक प्रेक्षकांच्या भेटीला आले. या नाटकाने संपूर्ण महाराष्ट्रात धुमाकूळ घातला. आता या नाटकाचा सुवर्ण महोत्सव साजरा होणार आहे. केवळ तीन महिन्यात ५० प्रयोग झालेल्या या नाटकाने प्रेक्षक, समीक्षक आणि मान्यवर अशा सगळ्यांचीच मने जिंकली आहेत.
बाल प्रेक्षकांना मराठीची गोडी लावणारं, स्क्रीन मधून बाहेर काढणारं आणि पालकांनाही हवंहवसं वाटणारं हे नाटक आता वेगवेगळ्या शाळा उपक्रम म्हणून दाखवू लागल्या आहेत. शिवाय वेगवेगळ्या महोत्सवांमध्येही नाटकाला जोरदार मागणी आहे.
क्षितीज पटवर्धन याने आतापर्यंत ‘डबल सीट’, ‘फास्टर फेणे’, ‘धुराळा’ अशा प्रसिद्ध चित्रपटांचे लेखन केले आहे. लेखक म्हणून आजवर क्षितीज पटवर्धन याने भरपूर नाव कमावले आहे. त्याने अनेक लोकप्रिय मराठी चित्रपटांच्या कथा आणि चित्रपटांची गाणी देखील लिहिली आहेत. नाटक, चित्रपट, जाहिराती, कविता, गाणी अशा अनेक माध्यमात लेखन करणारा क्षितिज पटवर्धन या नाटकाचे दिग्दर्शन करत आहे.
नाटकाविषयी बोलताना नाटकाचा लेखक दिग्दर्शक क्षितिज पटवर्धन म्हणाला की, "अनेक प्रेक्षकांनी उत्स्फूर्तपणे मराठीतील पहिलं ब्रॉडवे म्युझिकल अशी पावती आम्हाला दिली आहे. अनेक मुलांनी नाटक पाहून मराठी लिहायला वाचायला सुरुवात केली स्क्रीन टाईम कमी केला, ही आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. शिवाय अनेक पालक नाटकातील कलाकार आणि तंत्रज्ञ यांच्यासाठी भेटवस्तू, खायचे पदार्थ, पुस्तकं आपुलकीने घेऊन येतात, त्या प्रेमानेही भारावून जायला होत आहे.
रंगभूमीवर राज्य करणारी प्रसिध्द अभिनेत्री निर्मिती सावंत 'आज्जीबाई जोरात' या नाटकामध्ये धमाल उडवायला सज्ज झाली आहे. या नाटकातून अभिनय बेर्डे प्रथमच रंगभूमीवर पदार्पण करत आहे. निर्मिती सावंत आणि अभिनय बेर्डेसोबत पुष्कर श्रोत्री, मुग्धा गोडबोले, जयवंत वाडकर यांसारख्या अनुभवी कलाकारांची तगडी फौज देखील या नाटकातून आपल्या भेटीस येणार आहे. त्यामुळे चाहत्यांमध्ये नाटकाबाबत उत्सुकता पाहायला मिळत आहे.
वाचा: रणवीर सिंगनंतर अभिनेत्रीने केले अर्धनग्न अवस्थेत फोटोशूट, नेटकऱ्यांनी केली जोरदार टीका
येत्या १४ आणि १५ ऑगस्ट रोजी 'आजीबाई जोरात' या नाटकाचा सुवर्ण महोत्सवी प्रयोग होणार आहे. हा प्रयोग पुण्यामध्ये होणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये नाटकाविषयी उत्सुकता पाहायला मिळते.