Spruha Joshi Birthday: मुंबईतील 'या' कॉलेजमध्ये झाले स्पृहा जोशीचे शिक्षण, वाचा तिच्याविषयी खास गोष्टी
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Spruha Joshi Birthday: मुंबईतील 'या' कॉलेजमध्ये झाले स्पृहा जोशीचे शिक्षण, वाचा तिच्याविषयी खास गोष्टी

Spruha Joshi Birthday: मुंबईतील 'या' कॉलेजमध्ये झाले स्पृहा जोशीचे शिक्षण, वाचा तिच्याविषयी खास गोष्टी

Aarti Vilas Borade HT Marathi
Published Oct 13, 2024 08:09 AM IST

Spruha Joshi Birthday: कवयित्री, लेखिका ते गुणी अभिनेत्री म्हणून स्पृहा जोशी ओळखली जाते. तिचे शिक्षण मुंबईतील कोणत्या कॉलेजला झाले चला जाणून घेऊया...

Spruha Joshi
Spruha Joshi

मराठी इंडस्ट्रीमधील प्रतिभावान अभिनेत्री म्हणून स्पृहा जोशी ओळखली जाते. तिने आजवर अनेक चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केले आहे. तिची प्रत्येक भूमिका ही प्रेक्षकांच्या विशेष पसंतीला उतरल्याचे पाहायला मिळाले. आज १३ ऑक्टोबर रोजी स्पृहा जोशीचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने जाणून घेऊया स्पृहा जोशीविषयी काही खास गोष्टी...

मुंबईतच झाले शिक्षण पूर्ण

स्पृहाचा जन्म हा मुंबईत दादरच्या बालमोहन विद्यामंदिरमधून तिने आपले प्राथमिक शिक्षण पूर्ण केले तर. रामनारायण रुईया कॉलेजमधून तिने आपलं पदवी शिक्षण पूर्ण केलं. शालेय वयापासूनच तिला पुस्तके वाचनाची आवड होती. कविता वाचनाचा, लिहिण्याचा छंद तिने शालेय जिवनापासूनच जोपासला. शाळेत असतानाच स्पृहाने नृत्याचे धडे घेतले होते. त्यामुळे रुईया कॉलेजमध्ये शिक्षण घेत असताना तिने अनेक फेस्टिव्हलमध्ये सहभाग घेतला.

अभिनयाच्या कारकीर्दीला सुरुवात

स्पृहाने ‘दे धमाल’ या मालिकेतून आपल्या अभिनय कारकीर्दीचा श्रीगणेशा केला होता. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तिने पुन्हा एकदा मालिका विश्वातून करिअरची सुरुवात केली. अग्निहोत्र या मालिकेतल्या ‘उमा’ या भूमिकेमुळे स्पृहा जोशी प्रेक्षकांच्या घराघरांत पोहोचली. तर, २००४मध्ये तिने ‘माय बाप’ नावाच्या एका मराठी चित्रपटातही काम केलं होतं. ‘माय बाप’ या चित्रपटात स्पृहाने शास्त्रीय संगीत शिकणाऱ्या एका तरुण मुलीची भूमिका केली होती. मात्र, या चित्रपटानंतर ब्रेक घेऊन तिने आपलं शिक्षण पूर्ण करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान रामनारायण रुईया कॉलेजमध्ये पदवीचं शिक्षण घेत असताना तिने कॉलेजच्या नाटकांमधून काम करण्यास सुरुवात केली. कॉलेज जीवनात तिने ‘ग म भ न’, ‘युग्मक’, ‘एक और मय्यत’, ‘कोई ऐसा’, ‘कॅनवास’, ‘संत’, ‘एक अशी व्यक्ती’ आणि ‘अनन्या’ अशा नाटकांमध्येही काम केले.
वाचा: दीपिकापेक्षा करीनाने घेतली जास्त फी, वाचा ‘सिंघम अगेन’मधील कलाकारांच्या मानधनाविषयी

स्पृहाला कवितेची आवड

लहानपणापासूनच स्पृहाला वाचनाची आवड असल्यामुळे ती वेगवेगळ्या विषयावर कविता करायची. स्पृहाने तिच्या फेसबुक आणि यूट्यूब चॅनेलवर अनेक गाजलेल्या कवींच्या कवितांचे वाचन केले आहे. स्पृहाने अभिनेता संकर्षण कऱ्हाडेसोबत देखील काही कवितांचे वाचन केले होते. परदेशातही त्यांचे हे शो झाले होते. स्पृहाच्या ‘चांदणचुरा’ आणि ‘लोपामुद्रा’ या दोन्ही कविता संग्रहांना उदंड प्रतिसाद मिळाला.

Whats_app_banner