Sonali Kulkarni: ‘मलाही तसे काही नग भेटले होते’; कास्टिंग काऊचवर अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचं रोखठोक मत!
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Sonali Kulkarni: ‘मलाही तसे काही नग भेटले होते’; कास्टिंग काऊचवर अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचं रोखठोक मत!

Sonali Kulkarni: ‘मलाही तसे काही नग भेटले होते’; कास्टिंग काऊचवर अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचं रोखठोक मत!

Published Oct 03, 2024 10:33 AM IST

Sonali Kulkarni On Casting Couch: अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने नुकत्याच एका मुलाखतीत कास्टिंग काऊच या प्रकरणावर भाष्य केलं. यावेळी तिने आपल्यालाही अशी मागणी करणारे काही नग भेटले होते, असा खुलासा केला आहे.

Sonali Kulkarni On Casting Couch
Sonali Kulkarni On Casting Couch

Sonali Kulkarni On Casting Couch: सध्या हेमा समितीच्या अहवालामुळे दक्षिणात्य चित्रपट सृष्टीत चांगलीच खळबळ उडाली आहे. अनेक अभिनेत्रींनी स्वतःहून पुढे येऊन आपल्या सोबत घडलेल्या घटनांचा खुलासा केला आहे. यामुळे सध्या मनोरंजन विश्वात चांगलाच गदारोळ माजला आहे. दरम्यान काही अभिनेत्रींनी आपण या सगळ्याचा कशाप्रकारे सामना केला, हे देखील सांगितले आहे. मराठीसह हिंदीतही आपल्या अभिनयाचा जलवा दाखवणाऱ्या अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने नुकत्याच एका मुलाखतीत कास्टिंग काऊच या प्रकरणावर भाष्य केलं. यावेळी तिने आपल्यालाही अशी मागणी करणारे काही नग भेटले होते, असा खुलासा केला आहे.

‘डॉ. प्रकाश बाबा आमटे’, ‘अगं बाई अरेच्चा २’, ‘गुलाबजाम’, ‘सिंघम’, ‘दिल चाहते है’ या सारख्या विविध मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारलेल्या सोनालीने आपल्या स्पष्टवक्तेपणामुळे चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. सोनाली कुलकर्णी नुकतीच ‘इट्स मज्जा’च्या ‘ठाकूर विचारणार’ या मुलाखतीच्या कार्यक्रमात कास्टिंग काऊचवर आपली विचारधारा मांडली. तिने म्हटले, ‘मलाही असे काही नग भेटले. पण मला वाटत आपल्यात तेवढा सावधपणा असला पाहिजे. आपण स्वतः आपलं शोषण करु दिलं नाही पाहिजे.’ सोनालीने स्पष्ट केले की, भूमिका मिळवण्यासाठी कोणत्या अटींवर आपण सहमत आहोत, हे समजून घेणे आवश्यक आहे.

Kiran Mane Post: 'सोनालीने बॉलिवूडमध्ये नाव कमावलं, पण...'; किरण मानेंची 'ती' पोस्ट चर्चेत!

नकार देण्याचे धाडस येऊ द्या!

तिने पुढे स्पष्ट केले की, ‘आपल्याला त्या माणसाने असं कसं काय विचारलं याच दु:ख होण्या आधीच, तर त्याला तिथेच नकार देण्याची ताकद आपल्याकडे असली पाहिजे. मलाही असे नग भेटले होते. अशा माणसांना मी खूप आत्मविश्वासाने गप्प करु शकले आहे. मी त्यांना सरळ ठणकावून सांगितले की, हे चालणार नाही, मी माझी मर्यादा आहे आणि ही तुम्ही ओलांडू शकत नाही.’ सोनालीच्या या दृष्टीकोनामुळे अनेक नवीन कलाकारांना प्रेरणा मिळू शकते. तिचा ठाम आवाज आणि आत्मविश्वास नेहमीच तिला चर्चेत ठेवतो, ज्यामुळे ती यशस्वीपणे या कठीण परिस्थितीला तोंड देत आहे.

सोनालीच्या करिअरची ओळख फक्त चित्रपटांपुरती मर्यादित नाही. ती ओटीटी प्लॅटफॉर्मवरही सक्रिय झाली आहे. नुकतीच ती ‘मानवत मर्डर्स’मधून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे, ज्यामुळे तिच्या कार्यक्षेत्रातील विविधतेला आणखी एक नवा अनुभव मिळणार आहे. सोनालीने आपल्या दमदार अभिनयाने प्रत्येक पात्राला मोठ्या पडद्यावर जिवंत केले आहे. तिच्या अभिनयाचे नेहमीच खूप कौतुक होते.

Whats_app_banner