छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका 'रंग माझा वेगळा'मधील अभिनेत्री रेश्मा शिंदे लग्न बंधनात अडकली आहे. गेल्या काही दिवसांपासून रेश्माच्या लग्नाची जोरदार चर्चा रंगली होती. तिच्या लग्नसोहळ्याचे फोटो आता समोर आले आहेत. स्वत: रेश्माने सोशल मीडियावर हे फोटो शेअर केले आहेत. त्यामधील एका व्हिडीओने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. या व्हिडीओवर चाहत्यांनी कमेंट्स आणि लाइक्सचा वर्षाव केला आहे.
रेश्माने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर लग्नातील फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत. “आयुष्याची नवीन सुरुवात…” असं म्हणत रेश्मानं लग्नाचे फोटो शेअर केले आहेत. रेश्मा शुक्रवारी, २९ नोव्हेंबर रोजी विवाहबंधनात अडकली आहे. रेश्माचे जवळचे कुटुंबिय आणि जवळच्या मित्र-मैत्रिणींच्या खास उपस्थितीत हा विवाहसोहळा पार पडला.
रेश्माने लग्नात गुलाबी रंगाची नऊवारी साडी, हातात हिरवा चुडा, भरजरी दागिने, नाकात नथ अन् कपाळी चंद्रकोर असा मराठमोळा लूक केला होता. तर तिच्या नवऱ्याने ऑफ व्हाइट रंगाची शेरवानी आणि रेश्माच्या साडीला मॅचिंग असा त्यावर गुलाबी रंगाचा शेला घेतला होता. अशातच आता सोशल मीडियावर आणखी एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडीओमध्ये रेश्मा तिच्या नवऱ्याला वरमाला घालत आहे आणि वरमाला घालताना रेश्मा काहीशी भावुक झाली आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये रेश्माने वरमाला घातल्यानंतर ती तिच्या नवऱ्याची नजरही काढते. त्यानंतर अभिनेत्रीचा नवरा पवन हादेखील तिला वरमाला घालतो. या जोडीचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून या व्हिडीओला रेश्माच्या अनेक चाहत्यांनी लाईक्स व कमेंट्स करत चांगलाच प्रतिसाद दिला आहे.
वाचा: पदेशात स्थायिक झालेली माधुरी दीक्षित भारतात का परतली? अभिनेत्रीने पहिल्यांदाच केला खुलासा
पहिलं केळवण, घरगुती मेहंदीसोहळा, हळदी समारंभ, होणाऱ्या नवऱ्याची ओळख असा प्रवास करत रेश्माने पवनसोबत साता जन्माच्या गाठी बांधल्या आहेत. त्यांनी दाक्षिणात्य व मराठमोळ्या अशा दोन्ही पद्धतीने विवाह केला आहे. त्यांच्या लग्नातील फोटो सोशल मीडियावर सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहेत. रेश्माच्या कामाविषयी बोलायचे झाले तर ती 'रंग माझा वेगळा' मालिकेत दिसली होती. त्यानंतर आता ती स्टार प्रवाह वाहिनीवरील घरोघरी मातीच्या चुली या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे