Shiv Jayanti: छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठा साम्राज्याचा पाया रचला. स्वराज्य स्थापन करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी शत्रूंशी लढा देऊन, त्यांना परतवून लावले. आज १९ फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९४वी जयंती आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म १९ फेब्रुवारी १६३० ला पुण्यातील शिवनेरी किल्ल्यावर झाला होता. अनेकजण सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत शिवजयंती साजरी करत आहेत. सातासमुद्रापार अमेरिकेत देखील शिवजयंती उत्सव मोठ्याथाटामात साजरा केला गेला आहे. एका अभिनेत्रीने तेथील व्हिडीओ शेअर केला आहे.
स्टार प्रवाह वाहिनीवरील 'ठिपक्यांची रांगोळी' या मालिकेतील अभिनेत्री प्रांजल आंबवणेने अमेरिकेत बर्फाचा किल्ला तयार करुन शिवजयंती उत्सव साजरा केला आहे. तिने तेथील काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करत तिने 'सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभू राजा…. दरीदरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा !!!' असे कॅप्शन दिले आहे.
वाचा: रामलल्लासमोर ‘ड्रीम गर्ल’ हेमा मालिनी यांनी सादर केलं भरतनाट्यम! सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
प्रांजलने साजऱ्या केलेल्या अनोख्या शिवजयंतीवर सोशल मीडिया युजर्सने कौतुक केले आहे. प्रांजल ही सोशल मीडियावरही सक्रिय असते. त्यातून ती अनेकदा आपल्या कामाबद्दल आणि काही गोष्टी चाहत्यांसोबत शेअर करते. एका यूजरने 'आम्हाला तुझा अभिमान आहे' असे कॅप्शन दिले आहे. तर इतर काही यूजरने शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
प्रांजलने 'ठिपक्यांची रांगोळी' या मालिकेत नेत्रा हे पात्र साकारले होते. तिच्या कामाचे कौतुक झाले होते. प्रांजल आंबवणे ही सध्या अमेरिकेत आहे.