Pooja Sawant Siddhesh Chavan Wedding Mehendi: मराठी मनोरंजन विश्वाची ‘सो कलरफुल’ अभिनेत्री पूजा सावंत आता लग्न बंधनात अडकणार आहे. पूजा सावंत सिद्धेश चव्हाण याच्यासोबत सात फेरे घेणार आहे. तिच्या लग्न सोहळ्याला सुरुवात झाली असून, नुकताच तिचा मेहंदी सोहळा पार पडला आहे. याचे काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. पूजाच्या हातावर आता सिद्धेशच्या नावाची मेहंदी लागली आहे. मेहंदीसोबतच पूजाचा संगीत सोहळा देखील पार पडला आहे. या सोहळ्याला अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती.
अभिनेत्री पूजा सावंत हिच्या घरी लगीनघाई सुरू झाली आहे. आता तिच्या लग्नाआधीच्या विधींना सुरुवात झाली आहे. काहीच दिवस आधी पूजा आणि सिद्धेशचा यांचा साखरपुडा सोहळा पार पडला होता. पूजाचा साखरपुडा पार पडल्यापासून चाहत्यांना तिच्या लग्नाची उत्सुकता लागली होती. अखेर आता मुहूर्त जवळ आला असून, पूजा सिद्धेशबरोबर लग्नबंधनात अडकणार आहे. नुकताच पूजा सावंत हिच्या घरी मेहंदी सोहळा पार पडला असून, याचे काही फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आले आहेत. हातावर मेहंदी चेहऱ्यावर हसू... या लूकमध्ये पूजा खूपच सुंदर दिसत आहे. तिच्या चेहऱ्यावर नव्या नात्याचा आनंद दिसत आहे.
काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री पूजा सावंत हिने होणाऱ्या पतीसोबतचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. या फोटोंमध्ये पूजा सावंत हिच्या होणाऱ्या पतीचा चेहरा दिसला नव्हता. मात्र, तिने या फोटोतून आपले लग्न ठरले असल्याचे म्हणत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली होती. या बातमीनंतर पूजा लग्न कधी करणार अशी आतुरता सगळ्यांनाच लागली होती. मात्र, यावरही अभिनेत्रीने भाष्य करणं टाळलं होतं. वैयक्तिक आयुष्याविषयीच्या सगळ्याच गोष्टी पूजाने नेहमी कॅमेरापासून दूर ठेवल्या होत्या.
सोशल मीडियावर चर्चेत आलेल्या काही फोटो आणि व्हिडीओमध्ये पूजाने मेहंदीसाठी खास लूक केला असल्याचे पाहायला मिळत आहे. पूजाने मेहंदी लूकसाठी रंगीबेरंगी डिझाईन असलेला लेहंगा परिधान केला आहे. तिच्या या आउटफिटवर मोराची डिझाईनदेखील आहे. त्याचबरोबर या लूकला साजेसा मेकअप देखील तिने केला आहे. या मेहंदी लूकमध्ये पूजाचे सौंदर्य आणखीनच खुलून आले आहे. या मेहंदी सोहळ्याचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
संबंधित बातम्या