मराठी मालिका विश्वात अनेक कलाकार येत असतात आणि जात असतात. मात्र, यातील काही कलाकार असे होते, ज्यांनी प्रेक्षकांच्या मनात घर केले. मालिका विश्वातून दूर झाल्यानंतर देखील हे कलाकार प्रेक्षकांचे लाडके राहिले आहेत. अशाच कलाकारांपैकी एक नाव आहे अभिनेत्री मृणाल दुसानीस. ‘माझिया प्रियाला प्रीत कळेना’ या मालिकेतून मृणाल दुसानीसने प्रेक्षकांची मने जिंकून घेतली होती. मात्र, त्यानंतर तिने लग्नगाठ बांधून परदेशी स्थायिक होण्याचा निर्णय घेतला होता. आता लग्नाच्या ४ वर्षांनंतर ती भारतात परतली आहे. तसेच भारतात येतातच तिने स्वत:चा व्यवसाय सुरु केला आहे.
काही दिवसांपूर्वी मृणालने ती व्यवसाय सुरु करणार असल्याची माहिती दिली होती. पण ती नेमकं कुठे व्यवसाय करणार असा प्रश्न सर्वांना पडला होता. आता मृणालने ठाण्यातील पवई परिसरात एक आलिशान रेस्टॉरंट सुरु केल्याची माहिती समोर आली आहे. तिच्या या हॉटेलचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये हॉटेलच्या बांधकामापासून सुरु होणारी प्रोसेस तिने दाखवली आहे.
सोशल मीडियावर मृणालने रेस्टॉरंटचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये रेस्टॉरंटचे काम सुरु असल्याचे दिसत आहे. व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कमेंट करत मृणालचे अभिनंदन केले आहे. नवीन घर घेतलं का?, वाह नवीन व्यवसायाला सुरुवात, भारतात येताच नवा व्यवसाय अशा अनेक कमेंट नेटकऱ्यांनी मृणालच्या व्हिडीओवर केल्या आहेत.
मृणाल दुसानीस हिला भारतात पाहून चाहते देखील आनंदून गेले आहेत. मृणालला पाहून सगळ्यांनाच आता तिच्या सगळ्या मालिकांची आठवण आली आहे. मालिका विश्वात मृणाल दुसानीस हिने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना भुरळ घातली होती. ‘माझिया प्रियाला प्रीत कळेना’, ‘तू तिथे मी’, ‘असं सासर सुरेख बाई’, ‘सुखांच्या सरीचे हे मन बावरे’ अशा मालिकांमधून मृणाल दुसानीस हिने आपल्या अभिनयाचा जलवा दाखवला.
वाचा: नागा चैतन्य शोभिता धुलिपालाच्या लग्नाची पत्रिका व्हायरल, पाहुण्यांना काय भेट दिली पाहा
मालिका विश्व गाजवल्यानंतर २०१६मध्ये मृणाल दुसानीस हिने नीरज मोरे याच्याशी लग्नगाठ बांधली होती. यानंतर तिने पतीसोबत परदेशीच स्थायिक होण्याचा निर्णय घेतला होता. नीरज आणि मृणाल या जोडीला एक मुलगी देखील आहे. मृणाल दुसांनीस मनोरंजन विश्वापासून दूर राहून आपल्या पतीसोबत परदेशातच संसार थाटून आनंदाने आपला संसार सांभाळत होती. आता चार वर्षानंतर भारतात परत येऊन तिने आपल्या मूळ गावी भेट दिली आहे. मूळची नाशिकची असणाऱ्या मृणालने भारतात परतल्यावर पहिलं नाशिक गाठलं आहे. नाशिकमध्ये आल्यानंतर गोदाकाठी जाऊन तिने गोदामाईचं दर्शन घेतलं आहे.