Marathi Actors in Animal Movie: बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'अॅनिमल' या चित्रपटाने सध्या बॉक्स ऑफिसवर चांगलाच कल्ला केला आहे. या चित्रपटाचं कथानक आणि कलाकारांची फौज 'अॅनिमल'ला एका वेगळ्याच उंचीवर घेऊन गेली आहे. एकीकडे रणबीर कपूर आणि रश्मिका मंदाना या चित्रपटात असताना, दुसरीकडे मात्र काही मराठी चेहऱ्यांनी चित्रपटात चांगलाच कल्ला केला आहे. सध्या या मराठी चेहऱ्यांची चर्चाच अधिक होताना दिसत आहे. केवळ अभिनयचं नाही, तर या चित्रपटात खास अजय-अतुल या जोडीचं योगदान देखील आहे. प्रेक्षकांनीच हा भाग शोधून काढला आहे.
'अॅनिमल' या चित्रपटात रणबीर कपूर, बॉबी देओल आणि रश्मिका मंदाना यांच्यासोबतच मराठी अभिनेता उपेंद्र लिमये आणि अभिनेत्री मृण्मयी गोडबोले यांच्यादेखील महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत. अभिनेता उपेंद्र लिमये याने या चित्रपटात एका आर्मी अधिकाऱ्याची भूमिका केली आहे. या भूमिकेतून त्याने हिंदी प्रेक्षकांच्या मनावर देखील छाप सोडली आहे. या चित्रपटात कथेच्या एका मोठ्या वळणावर उपेंद्रच्या पात्राची एंट्री होते. यावेळी त्याचा 'चांगभलं' हा डायलॉग प्रेक्षकांचे मन जिंकून घेतो. या चित्रपटात उपेंद्र लिमये याचे अनेक संवाद मराठीत ऐकायला मिळाले आहेत. यामुळे चित्रपटाला एक वेगळीच मजा आली आहे. प्रेक्षक देखील याला दाद देत आहेत.
केववल उपेंद्र लिमयेच नव्हे, तर मराठमोळी अभिनेत्री मृण्मयी गोडबोले सुद्धा या चित्रपटात दिसली आहे. या चित्रपटात मृण्मयीने अगदीच छोटेसे पात्र साकारले आहे. मात्र, तरीही तिची ही भूमिका भाव खाऊन गेली आहे. मृण्मयी गोडबोले हिने 'अॅनिमल'मध्ये एका मानसोपचारतज्ज्ञाची भूमिका साकारली आहे. या भूमिकेला तिने चांगला न्याय दिला आहे. यासोबतच प्रेक्षकांना 'अॅनिमल' या चित्रपटात अजय-अतुलची झलक पाहायला मिळाली आहे. या चित्रपटातील एका फायटिंग सीन दरम्यान अजय-अतुल यांचे ‘डॉल्बीवाल्या बोलव माझ्या डीजेला’ हे गाणे ऐकायला मिळाले आहे. हिंदी चित्रपटात मराठी गाणं वाजताच प्रेक्षकांकडून टाळ्या आणि शिट्ट्यांच्या वर्षाव होत आहे. यामुळे मराठी कलाकारांनी 'अॅनिमल' गाजवला, असे सगळेच म्हणत आहेत.
संबंधित बातम्या