सध्या मराठी इंडस्ट्रीमध्ये वेगवेगळ्या विषयावर आधारित सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला येत असतात. त्या प्रमाणे रंगभूमीवर देखील वेगवेगळ्या नाटकांचे प्रयोग होताना दिसत आहेत. जयवंत दळवी यांच्या लेखणीतून साकारलेल्या 'पुरुष' या नाटकाने एकेकाळी मराठी रंगभूमी गाजवली होती. आता हे नाटक पुन्हा एकदा रंगभूमीवर येऊन धकडले आहे. या नाटकाचा प्रयोग पुन्हा होणार आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल कधी आणि कुठे होणार 'पुरुष' नाटकाचा प्रयोग. चला जाणून घेऊया...
स्त्री- पुरुष संबंध, सामाजिक विषमता आणि स्त्री च्या संघर्षाची कथा 'पुरुष' या नाटकात पाहायला मिळणार आहे. नाटकातील संवेदनशील आणि सामाजिक संवादामुळे त्यावेळी हे नाटक मराठी रंगभूमीवर एक मैलाचा दगड ठरले होते. मराठी रंगभूमीवरील ही महत्वपूर्ण कलाकृती सुमारे चाळीस वर्षांनंतर नाट्यप्रेमींना पुन्हा एकदा अनुभवायला मिळणार आहे. स्त्री पुरुष समानता, स्त्रीची अस्मिता, समाजातील पुरुषप्रधान मानसिकतेवर टीका, सामाजिक स्थितीवर भाष्य हे विषय या कथेच्या केंद्रस्थानी असून ते प्रेक्षकांना विचार करण्यास भाग पाडणारे आहेत.
'पुरुष' हे नाटक पुन्हा एकदा रंगभूमीवर येण्यासाठी सज्ज झाले असून येत्या १४ डिसेंबर रोजी या नाटकाचा पहिला प्रयोग सादर होणार आहे. राजन ताम्हाणे दिग्दर्शित, जयवंत दळवी लिखित या नाटकात श्रीकांत तटकरे, समिता भरत काणेकर निर्माते आहेत. या नाटकात स्पृहा जोशी, अविनाश नारकर, अनुपमा ताकमोगे, निषाद भोईर, नेहा परांजपे आणि शरद पोंक्षे प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. या नाटकाला विजय गवंडे यांचे संगीत लाभले आहे.
वाचा: पद्मिनी कोल्हापुरे आणि सचिन खेडेकर यांच्या 'चिमणी पाखरं'मधील अंजू आठवतेय का? वाचा सध्या काय करते
'पुरुष' हे नाटक जवळपास ४० वर्षांनंतर पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्यामुळे अभिनेते शरद पोंक्षे यांनी आनंद व्यक्त केला आहे. "८० च्या दशकातील अतिशय गाजलेलं नाटक 'पुरुष'. आज त्या नाटकाला ४० वर्षे उलटून गेली असून तेच नाटक जयवंत दळवी यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने आम्ही पुन्हा रंगमंचावर आणत आहोत. या नाटकाचे केवळ ५० प्रयोग होणार असून महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात याचे प्रयोग होणार आहेत. त्यामुळे ही सुंदर कलाकृती आम्ही नाट्यप्रेमींसमोर घेऊन येण्यासाठी प्रचंड आतुर आहोत. हे नाटक पुन्हा एकदा रंगभूमीवर आणण्याचे आणखी एक कारण म्हणजे आजही समाजात अनेक ठिकाणी अशी परिस्थिती आहे आणि ही स्थिती मला कायमच अस्वस्थ करते. हीच विचारसरणी बदलण्यासाठी आम्ही हे नाटक घेऊन आलो आहोत. 'पुरुष'मध्ये केवळ सामाजिक प्रश्न हाताळण्यात आला नसून यात त्याचे उत्तरही दडलेले आहे'' असे शरद पोंक्षे म्हणाले.
संबंधित बातम्या