Marathi Actor Deepak Shirke Life Story : हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीत खलनायकाच्या भूमिकांसाठी ओळखले जाणारे अभिनेता दीपक शिर्के यांचा प्रवास फारच संघर्षपूर्ण आणि प्रेरणादायी आहे. ‘थरथराट’, ‘दे दणादण’, ‘अग्निपथ’, ‘धडाकेबाज’, ‘हम’, ‘वंश’, ‘तिरंगा’, ‘व्हेंटिलेटर’ यांसारख्या चित्रपटांमध्ये आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतलेल्या दीपक शिर्के यांचा जीवनप्रवास खूप कमी लोकांना माहीत आहे. त्यांचा संघर्ष, मेहनत आणि सातत्य यामुळेच आज त्यांचा अभिनय क्षेत्रातील प्रवास लक्षवेधी ठरला आहे.
दीपक शिर्के यांचा जन्म २९ एप्रिल १९५५ रोजी मुंबईतील गिरगाव, चिरा बाजार येथे झाला. घरची आर्थिक स्थिती सुरुवातीला चांगली होती, पण वयाच्या १३व्या वर्षीच त्यांच्या वडिलांचे निधन झाले. यामुळे घराची आर्थिक स्थिती चांगलीच बिकट झाली होती. एकाएकी श्रीमंतीतून त्यांचं आयुष्य निर्धनतेकडे झुकलं. घराचा मोठा मुलगा म्हणून सगळी जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आल्याने त्यांनी काम करण्यास सुरूवात केली. दीड वर्षं वाल सोलून देण्याचे काम करत त्यांनी अत्यंत तुटपुंज्या उत्पन्नावर आपले जीवन जगण्यास सुरुवात केली. वेळेप्रसंगी केवळ कांदा आणि पाव खाऊन त्यांनी दिवस काढले. यातूनच त्यांनी खूप मोठी शिकवण घेतली.
आर्थिक संकट असतानाही दीपक यांना मिळालेला आईचे पाठिंबा आणि तिच्या नोकरीमुळे घराचा गाडा काहीसा सुरळीत झाला. शालेय जीवनात दीपक यांचे मन अभ्यासाला फारसे रमले नाही. पण शाळेतील नाटकांच्या तालमींमध्ये ते नियमितपणे हजर राहायचे. शालेय नाटकातून त्यांना अभिनयाची आवड लागली आणि ते साहित्य संघाच्या नाटकांमध्ये भूमिका करू लागले. यामुळे त्यांना अभिनय क्षेत्रात पाऊल टाकण्याची संधी मिळाली.
दीपक शिर्के यांचे खऱ्या अर्थाने अभिनय क्षेत्रात पदार्पण ‘टूरटूर’ या नाटकातून झाले. या नाटकामुळे ते लक्ष्मीकांत बेर्डे यांच्याशी परिचित झाले आणि त्यांच्याच माध्यमातून दीपक शिर्के यांना मराठी चित्रपटांमध्ये काम मिळू लागले. लक्ष्यामुळेच आज आपण या ठिकाणी आहोत, असे ते नेहमी म्हणतात. त्यानंतर त्यांनी खलनायकाच्या भूमिकांमध्ये ओळख मिळवायला सुरुवात केली. शरीरयष्टीमुळे सुरूवातीला त्यांना खलनायकाच्या भूमिका दिल्या जात होत्या. ‘इरसाल कार्टी’ हा दीपक शिर्के यांचा पहिला मराठी चित्रपट होता.
दीपक शिर्के यांना हिंदी चित्रपटसृष्टीत ‘आक्रोश’ चित्रपटाद्वारे संधी मिळाली आणि त्यानंतर ‘तिरंगा’, ‘अग्निपथ’, ‘कालिया’ अशा अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी खलनायकाच्या भूमिका अजरामर केल्या. 'अग्निपथ' मधील ‘अण्णा शेट्टी’ आणि ‘तिरंगा’ मधील ‘गेंडा स्वामी’ या भूमिकांनी त्यांना खास ओळख मिळवून दिली. त्यांच्या अभिनयात असलेली ताकद आणि तीव्रता प्रेक्षकांना कायमच भावली आहे.