सिंधुदुर्गच्या समुद्रकिनारी राजकोट किल्ल्याच्या परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांचा ३५ फुटांचा भव्य पुर्णाकृती पुतळा उभारला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते ४ डिसेंबर २०२३ रोजी नौदल दिनाच्या निमित्ताने या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले होते. मात्र उद्घाटनाच्या ८ महिन्यातच हा पुतळा कोसळला आहे. सोमवारी हा पुतळा कोसळल्यानंतर राज्यभरातील शिवप्रेमींकडून संताप व्यक्तकेला जात आहे. मराठी चित्रपट व मनोरंजन सृष्टीतील कलाकारही यावर व्यक्त होत आहेत. आता अभिनेते किरण माने यांनी सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून या घटनेचा निषेध करत राज्य सरकारवर टीका केली आहे.
खूप वेदना झाल्या. मला कळायला लागल्यापासून तरी मी ही पहिली घटना पाहिली की, छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळला आहे. तो ही थेट पंतप्रधानाच्या हस्ते अनावरण झालेला पुतळा! पुतळा एवढा जुना ही नाही की, नेहरुंच्या किंवा इंदिराजींच्या काळातला असावा... मोदीजींच्या हस्ते उद्घाटन झालेला पुतळा होता हा. दहा वर्षांपुर्वींचा नाही, अगदी कालपरवा...इलेक्शनच्या चारपाच महिने आधी...राममंदिराच्या दिड महिना आधी उभारलेला! त्यानंतर, फक्त २६६ दिवसांतच ही नामुष्की आणणारी दुर्घटना घडते?
यांच्या हस्ते उद्घाटनं झालेल्या विमानतळांची छतं कोसळताना आपण पाहिली...पूल कोसळताना पाहिले...पुलांना भेगा पडलेल्या पाहिल्या...बोगदे पाण्यानं तुंबलेले पाहिले.. .रस्ते खचलेले पाहिले... राममंदिराचा गाभारा गळताना पाहिला... नवीन संसदेचा मार्ग पाण्याखाली गेलेला पाहिला...नवीन संसद इमारतीच्या छताला गळती लागून बादल्या ठेवाव्या लागल्याचे लाजिरवाणे दृश्य पाहिले... जगापुढे शरमेने मान खाली जावी, अशा या घटना... पण,त्या सगळ्यावर या घटनेनं मात केली!
प्रतापगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा जो सुंदर,चित्ताकर्षक पुतळा आहे, त्याला येत्या नोव्हेंबर मध्ये ६७ वर्ष पूर्ण होतील... गेली सात दशकं तब्बल १२० वेगाने येणारे वारे झेलत हा पुतळा आजही दिमाखात उभा आहे ! या पुतळ्याचं उद्घाटन केलं होतं भारताचे अत्यंत बुद्धीमान, संवेदनशील, मानवतावादी, देखणे, रुबाबदार पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांनी.
फलटणचे श्रीमंत मालोजीराजे नाईक निंबाळकर यांना सतत एका गोष्टीची खंत होती की छत्रपतींच्या शौर्याची, पराक्रमाची साक्ष देत उभ्या असलेल्या प्रतापगडावर शिवरायांचं स्मारक नाही. त्यांनी ही खंत त्यावेळचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांना बोलून दाखवली. यशवंतरावांना हे मनोमन पटलं. तातडीने हालचाली करून राजभवनात मिटींग घेऊन प्लॅन ठरला. पं. नेहरूंचीही तात्काळ मान्यता मिळाली. त्यावेळी गडावर जाण्यासाठी रस्ते नव्हते. प्रचंड मेहनत घेऊन,अनेक अडचणींवर मात करून, तब्बल दोन वर्ष युद्धपातळीवर हालचाली करून हे स्मारक उभं राहिलं. पंडितजी स्वत: या उद्घाटनाला आले.
त्यावेळी संयुक्त महाराष्ट्राची चळवळ सुरू होती. आंदोलनं निदर्शनं सुरू होती. त्यावेळचे सत्ताधारी नेते स्मारकाचे उद्घाटन हा प्रचाराचा'इव्हेन्ट'समजत नव्हते. त्यामुळे ती आंदोलनं राजकीय ठरवत पंडित नेहरुंनी किंवा यशवंतरावांनी दडपली नाहीत. आंदोलकांवर अमानुष लाठीचार्ज केला नाही. पंडित नेहरूंनी स्वत:चा मार्ग बदलून कास पठारमार्गे प्रतापगडावर आले. उद्घाटन केलं.
छत्रपतींचे खरे विचार अंगी बाणलेले तगडे लोक एकत्र आल्यावर असं चिरकाल टिकणारं शिल्प तर उभं रहातंच... पण काळाच्या कसोटीवर भक्कमपणे उभं राहून झळकणारं देशहिताचं कार्यसुद्धा हातून घडतं.
"हे मी केलं,हे मी केलं." सांगण्यासाठी घाईघाईत पोकळ कामं करून, फोटो काढून जाहिरातबाजी करून जनतेला गंडा घालणारे पोकळ नेते कधी ना कधी उघडे पडतातच. कसोटीच्या काळात आणि काळाच्या कसोटीत तोच टिकतो, जो 'सच्चा'आहे.