मराठी चित्रपटसृष्टीमधील खलनायक म्हणून अभिनेते अनंत जोग ओळखले जातात. त्यांनी आजवर अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये काम करत प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. त्यांची प्रत्येक नकारात्मक भूमिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीला उतरली. पण तुम्हाला माहिती आहे का अनंत जोग हे या सगळ्या नकारात्मक भूमिकांमुळे आज अभिनेता असण्याऐवजी कदाचित चोर किंवा गुंड असते. त्यांनी स्वत: एका कार्यक्रमात हा खुलासा करत सर्वांना चकीत केले आहे.
अनंत जोग यांनी नुकताच स्मृतीगंध या युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांना “तुम्ही जर नट नसतात तर काय असता?” असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर अनंत जोग यांनी दिलेल्या उत्तराने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. “नट नसतो तर मी कदाचित गुंड किंवा भुरटा चोर असतो. याचा एक किस्सा आहे की, मी एकदा माझ्या वडिलांबरोबर ताज हॉटेलमध्ये कोणत्या तरी कार्यक्रमाला गेलो होतो. तर तिथल्या टॉयलेटमध्ये मला अॅश्ट्रे (AshTray) दिसला. तर मी म्हटलं काय मूर्ख लोक आहेत, इतका चांगला अॅश्ट्रे इथे का ठेवला? तर मी तो खिशात घातला आणि घरी गेलो” असे अनंत जोग म्हणाले.
पुढे ते म्हणाले, “घरी जाऊन आईने विचारलं, हे कुणी आणलं? मी म्हटलं मी आणलं. तर तिने ते वडिलांना सांगितलं. आज आणखी एक लग्न आहे आपण पुन्हा जाऊन आणि याचसारखा आणकी एक अॅश्ट्रे आणू. तिथे गेल्यानंतर मला वाटलं होतं की, लग्न असेल पण तिथे तसं काहीच नव्हतं. तर वडिलांनी तिथल्या मॅनेजरला सांगितले की, माझ्या मुलाने तुमच्या हॉटेलमधून हा अॅश्ट्रे चोरला आहे. तर याला काय शिक्षा असेल ती द्या. नंतर वडिलांनी मला तिथल्या सर्व लोकांची माफी मागून असं मी पुन्हा कधी करणार नाही असं म्हणायला सांगितलं आणि मी असं काही केलं नाही तर मी इथून जाताना एकटा जाणार, तू कसं यायचं ते बघ असं म्हटलं. तेव्हा मी आठवी किंवा नववीमध्ये होतो.”
या मुलाखतीमध्ये अनंत जोग यानी आणखी एक किस्सा सांगितला. त्यांनी एकदा बस कंडक्टरला मारले होते. त्यामुळे बस चालकाने बस थेट पोलिस ठाण्यात नेली. तेव्हा त्यांच्यासोबत दोन मित्र देखील होते. अनंत यांचे वागणे पाहून घाबरले होते. त्याकाळात कोणाकडे मोबाईल नव्हता. त्यामुळे वडिलांना पोलिसांना कसे कळवले ते त्यांना कळाले नाही. वडिलांनी पोलिस ठाण्यात फोन केला. "मी पोलिसांना विचारले की वडील काय म्हणाले, तर माझ्या वडिलांनी पोलिसांना सांगितले होते की, तुम्ही त्याला आणखी आठ दिवस तुरुंगात ठेवा. त्याची तिच लायकी आहे आणि तुम्ही तसं नाही केलं तर मी तुमच्या वरिष्ठांना तुमची तक्रार करेन” असे अनंत म्हणाले.
त्यानंतर अनंत यांनी मित्राच्या वडिलांना फोन केला. ते एक वकील होते. त्यांनी तिघांचाही जामिन केला. या दोन घटना घडल्यामुळे अनंत हे नट बनले. पुढे अनंत म्हणाले की, "मी कुणी तरी गुंड झालो असतो आणि माझा खून झाला असता किंवा माझ्या हातून काही खून झाले असते. माझा स्वभाव बघता त्याची शक्यता जास्त आहे.”
वाचा: 'करण-अर्जुन'मधील बिंदिया सध्या काय करते? १९९३ साली टॉपलेस फोटोशूटमुळे होती चर्चेत
अनंत जोग यांच्या कामाविषयी बोलायचे तर त्यांनी आजवर अनेक हिंदी आणि मराठी चित्रपटांमध्ये काम केले आहे. ‘भुताचा भाऊ’, ‘हस्ती’, ‘हेलो नंदन’, ‘साथी’, ‘कांची’, ‘पुरुष’, ‘जनम’, ‘मधहोष’, ‘विजयपथ’, ‘नो एण्ट्री’, ‘सरकार’ ‘झिम्मा’ ‘सिंघम’ यांसारख्या अनेक सुपरहिट चित्रपटांत काम केले आहे.