मराठी मनोरंजन विश्वातील दिग्गज अभिनेता, लेखक आणि दिग्दर्शक असलेला चिन्मय मांडलेकर गेल्या काही काळापूर्वी त्याच्या मुलाच्या नावामुळे चांगलाच ट्रोल झाला होता. चिन्मय मांडलेकर याच्या मुलाचे नाव जहांगीर मांडलेकर असल्याने अनेकांनी अभिनेत्याला आणि त्याच्या कुटुंबाला अतिशय अश्लाघ्य शब्दांमध्ये ट्रोल केले होते. मात्र, यावेळी अभिनेत्याने स्वतः एक व्हिडीओ रेकॉर्ड करत चाहत्यांशी थेट संवाद साधला होता. इतकंच नव्हे तर, त्याने आपल्या मुलाच्या नावाचा अर्थ देखील सांगितला होता. टजहांगीर हा केवळ एक दुष्ट शासक नव्हता, तर जहांगीर या नावाचा अर्थ खूप सुंदर आहे. आम्ही त्या दुष्ट शासकाच्या नावावरून नव्हे, तर जहांगीर या नावाच्या सुंदर अर्थावरून हे नाव आमच्या मुलाला दिलं होतं. पर्शियन भाषेतील या शब्दाचा अर्थ खूपच सुंदर आहे’, असं चिन्मय आणि त्याची पत्नी नेहा मांडलेकर यांनी म्हटलं होतं. त्यानंतर अनेक कलाकारांनी या प्रकरणावर आपापली मतं व्यक्त केली. तर, अभिनेता आस्ताद काळे याने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखती स्वतःच्या नावाचा खुलासा करत नावावरून होणाऱ्या विवादावर थेट भाष्य केलं आहे.
अभिनेता असतात काळे याने नुकतीच एक मुलाखत दिली. ‘बिग बॉस मराठी’, ‘पुढचं पाऊल’ अशा काही शोमुळे आस्ताद काळे घराघरात पोहोचला आहे. आस्तादने केवळ मालिकाच नव्हे, तर नाटक आणि चित्रपटातून देखील प्रेक्षकांचा मनोरंजन केलं आहे. नुकत्याच त्याने दिलेल्या एका मुलाखतीत स्वतःच्या नावाविषयी मोठा खुलासा केला आहे. आस्ताद हे नाव देखील पर्शियन असून, आता त्यांना पर्शियन नावाच्या ट्रोलिंगबद्दल आपलं मत व्यक्त केलं आहे. यावेळी बोलताना त्याने चिन्मय मांडलेकरच्या मुलाच्या नावावरून झालेल्या गदारोळावरही आपलं मत व्यक्त केलं.
‘आस्ताद’ हे नाव देखील पर्शियन आहे, त्यावरून बोलताना अभिनेता म्हणाला की, ‘नशिबाने माझ्या नावाचा कुणी सुलतान वगैरे होऊन गेला नाही म्हणून बरं... त्यामुळे माझे आई-वडील ट्रोल होण्यापासून तरी वाचले. मला वाटतं नाव हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे. तुम्हाला वाटतं का गजानन नावाचा माणूस गुन्हेगार होऊ शकत नाही? असं अजिबात नाहीये. गजानन नावाचे देखील अनेक गुन्हेगार आहेत आणि त्यांच्याविषयी सगळ्यांनाच माहिती आहे. इतकंच नाही तर अनेक वेगवेगळ्या नावाचे गुन्हेगार होऊन गेले आहेत. त्यामुळे नावात काहीच ठेवलेलं नसतं. तुम्ही घरी काय संस्कार करता, यावर सगळं अवलंबून असतं.’
पुढे आस्ताद काळे म्हणाला की, ‘प्रत्येक गोष्ट धर्म आणि जातीकडेच न्यायची असेल, तर जाऊ दे. ती एक घाणेरडी मनोवृत्तीच आहे. मी त्याला विरोधी करायला जाणार नाही आणि पाठिंबा तर अजिबातच देणार नाही. चिन्मय आणि नेहा यांनी हा मुद्दा खूप परिपक्वपणे हाताळला. सुदैवाने मला त्याचा सामना करावा लागला नाही. कारण माझं नाव जेव्हा ठेवलं गेलं, तेव्हा धार्मिक भावना इतक्याही बोथट नव्हत्या. आस्ताद हे नाव पारशी किंवा पर्शियन आहे, हेच आजपर्यंत लोकांना माहीत नसेल. कारण या नावाचा सुलतान किंवा जुलमी आक्रमणकर्ता होऊन गेलेला नाही. आतापर्यंत तरी हे नाव इतिहासात पुढे आलेलं नाही. आलं असतं तर माझंही ट्रोलिंग झालं असतं आणि पुढे आलं तर माझंही ट्रोलिंग होईलच. मग बघू काय करायचं ते..’, असं आस्ताद म्हणाला.
संबंधित बातम्या