SangharshYoddha Movie Teaser Out: मराठा समाजाच्या मुद्द्यावर गेले काही महिने महाराष्ट्र आणि राज्यातील राजकारण अक्षरशः ढवळून निघालं आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी संघर्ष करत असलेले मनोज जरांगे पाटील यांची कहाणी आता मोठ्या पडद्यावर देखील पाहायला मिळणार आहे. ‘संघर्षयोद्धा- मनोज जरांगे पाटील’ या चित्रपटातून त्यांची कथा मोठ्या पडद्यावर मांडली जाणार आहे. या चित्रपटाचा धमाकेदार टीझर नुकताच लाँच करण्यात आला आहे. मराठा आरक्षणासाठी लढा देणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या आयुष्यावर आधारित हा चित्रपट ‘संघर्षयोद्धा’ २६ एप्रिल रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी संपूर्ण महाराष्ट्रात ‘मराठा आंदोलना’ची ज्योत पेटवली आहे. महाराष्ट्रात मोठ्या संख्येने असलेला मराठा समाज आर्थिक सक्षमते अभावी शिक्षण, रोजगारात मागे पडत असल्याने या समाजाला आरक्षण देण्याची मागणी करण्यात येत आहे. याच मागणीसाठी ‘एक मराठा, लाख मराठा’ म्हणत २०१६मध्ये राज्यभर भव्य मोर्चे निघाले होते. त्यानंतर राज्य सरकारने दिलेले आरक्षण न्यायालयात टिकले नाही. याच पार्श्वभूमीवर मराठा आरक्षणाच्या मागणीने पुन्हा एकदा जोर धरला आहे. याच संघर्षात योद्धा म्हणून उतरणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या प्रत्येक हालचालीने मराठा आरक्षणाच्या आंदोलनाने एक पाऊल पुढे टाकले.
मनोज जरांगे पाटील बऱ्याच वर्षांपासून मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी संघर्ष करत आहेत. त्यांचे उपोषण, भाषणे, दौरे यांना राज्यात प्रचंड प्रतिसाद मिळाला. मराठा समाजाच्या ताकदीचं दर्शनच या निमित्ताने झालं. मनोज जरांगे पाटील यांना मिळत असलेल्या प्रतिसादामुळे राज्य सरकारातील मंत्री, मुख्यमंत्री, अन्य नेत्यांनाही त्यांची दखल घ्यावी लागली. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुकारलेला एल्गार धमाकेदार ‘संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील’ या चित्रपटाच्या टीझरमधून दिसत आहे. लाखोंची गर्दी, उधळला जाणारा गुलाल यामुळे आंदोलनाचा माहौल चित्रपटातही टिपला गेला आहे.
सोनाई फिल्म क्रिएशन या निर्मिती संस्थेतर्फे ‘संघर्षयोद्धा’ मनोज जरांगे पाटील या चित्रपटाची निर्मिती करण्यात येत आहे. चित्रीकरणाच्या पहिल्या दिवशी मनोज जरांगे पाटील यांची भूमिका साकारत असलेले रोहन पाटील, अभिनेता संदीप पाठक, सागर कारंडे, अरबाज शेख हे देखील उपस्थित होते. गोवर्धन दोलताडे यांनी चित्रपटाची कथा आणि निर्मितीची बाजू सांभाळली आहे. सुधीर निकम यांनी पटकथा आणि संवाद केले आहे, तर शिवाजी दोलताडे दिग्दर्शनाची जबाबदारी निभावत आहेत. चित्रपटात अभिनेत्री सुरभी हांडे, अभिनेते मोहन जोशी, श्रीनिवास पोकळे, संजय कुलकर्णी, माधवी जुवेकर, विजय मिश्रा, विनीत भोंडे, सुनील गोडबोले, जयवंत वाडकर यांच्या ही प्रमुख भूमिका आहेत.