बॉलिवूड कलाकार हे त्यांच्या आलिशान लाइफसाठी विशेष ओळखले जातात. त्यांच्याकडे असलेल्या लग्झरी गाड्या, आलिशान घरे चाहत्यांचे लक्ष वेधून घेत असतात. नुकताच राष्ट्रीय पुरस्कार विजेते अभिनेते मनोज वाजपेयी यांनी मुंबईतील त्यांचे आलिशान घर विकले आहे. या घराचा व्यवहार कोट्यवधी रुपयांमध्ये झाला आहे. आता नेमकं किती रुपयांना मनोज यांचे घर विकले गेले हे जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.
मनोज वाजपेयी यांनी नुकताच मुंबईतील त्यांचे आलिशान घर विकल्याची माहिती समोर आली आहे. मनोज वाजपेयी यांनी त्यांची पत्नी शबाना वाजपेयीसोबत या घराची खरेदी केली होती. पण आता त्यांनी या घराची विक्री केली असून कोट्यवधी रुपयांचा व्यवहार झाल्याची माहिती समोर येत असल्याचे म्हटले जात आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार मनोज वाजपेयी यांनी २०१३ मध्ये मुंबईत घर खरेदी केले होते. तेव्हा त्यांनी या घरासाठी ६.४ कोटी रुपयांची रक्कम मोजली होती. त्यानंतर आता ११ वर्षांनंतर मनोज वाजपेयी यांनी हे घर विक्रीसाठी काढले आहे. या घरासाठी त्यांना जवळपास ९ कोटी रुपये मिळाले आहेत. त्यांना जवळपास २.६ कोटी रुपयांचा नफा झाला आहे. बॉलीवूड हंगामाने दिलेल्या वृत्तानुसार, मनोज वाजपेयीने ५४ लाख रुपये स्टँप ड्यूटी भरुन हे घर खरेदी केले असल्याचे म्हटले जात आहे.
मनोज वाजपेयींनी हे घर गुंतवणूक करण्यासाठी घेतले होते. पण अचानक त्यांनी मुंबईतील हे घर विक्रीसाठी का काढले याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. चाहते याविषयी जाणून घेण्यासाठी आतुर आहेत.
मनोज वाजपेयी यांनी २०१३मध्ये मुंबईतील लोअर परळमधील मिनर्वा येथील महालक्ष्मी टॉवरमध्ये हे घर खरेदी केले होते. हे घर १२४७ क्वेअर फूट आहे. पण आता मनोज यांनी हे घर विकले आहे. मनोज हे आपल्या पत्नी आणि मुलांसोबत अंधेरीमधील लोखंडवाला येथे राहात आहेत.
वाचा: 'पब्लिसिटी स्टंट', अरशद वारसीने प्रभासला जोकर म्हटल्याने दाक्षिणात्य कलाकार संतापले
मनोज वाजपेयी नुकताच 'गुलमोहर' (Gulmohar) या सिनेमासाठी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला होता. नुकताच त्यांचा 'भैय्या जी' हा शंभरावा सिनेमा देखील प्रदर्शित झाला होते. त्याची निर्मिती देखील मनोज वाजपेयी यांनी केली होती. पण हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर मात्र चांगली कामगिरी करु शकला नाही.