Mangalagaur: ‘नव दांपत्याची मंगळागौर’; नेत्रा, लीला आणि शिवा मिळून पहिल्यांदाच खेळणार गंमतीशीर खेळ-mangalagaur 2024 a fun game that netra leela and shiva will play together for the first time ,मनोरंजन बातम्या
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Mangalagaur: ‘नव दांपत्याची मंगळागौर’; नेत्रा, लीला आणि शिवा मिळून पहिल्यांदाच खेळणार गंमतीशीर खेळ

Mangalagaur: ‘नव दांपत्याची मंगळागौर’; नेत्रा, लीला आणि शिवा मिळून पहिल्यांदाच खेळणार गंमतीशीर खेळ

Aug 07, 2024 12:15 PM IST

Mangalagaur 2024:प्रेक्षकांच्या आवडत्या मालिकांमध्येही नुकतेच लग्न सोहळे पार पडले आहेत. आता या सगळ्या नायिका एकत्र येऊन या'नव दामपत्यांची मंगळागौर' साजरी करत आहेत

Mangalagaur 2024
Mangalagaur 2024

Mangalagaur 2024: नुकताच श्रावण महिना सुरू झाला आहे आणि त्यासोबतच सणांना सुद्धा सुरुवात होत आहे. नवीन लग्न झालेली जोडप्यांसाठी अनेक सण साजरे केले जातात आणि त्यातलाच एक महत्वाचा सण म्हणजे मंगळागौर. नवविवाहित आणि सौभाग्यवती महिला हा सण साजरा करतात. प्रेक्षकांच्या आवडत्या मालिकांमध्येही नुकतेच लग्न सोहळे पार पडले आहेत. आता या सगळ्या नायिका एकत्र येऊन या 'नव दामपत्यांची मंगळागौर' साजरी करत आहेत. कसा होता त्यांचा अनुभव जाणून घेऊया…

‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ फेम ‘नेत्रा’ म्हणजेच अभिनेत्री तितिक्षा तावडे म्हणाली की, ‘मी पहिल्यांदाच मंगळागौर खेळले. याआधी मला कधी संधी मिळाली नव्हती. पण यावर्षी खऱ्या आयुष्यात माझं लग्नही झालंय  आणि हा मंगळागौरीचा योग जुळून आला. माझ्यासाठी खूप आनंदमय अनुभव होता. मी छान नऊवारी नेसली होती. एकंदरच मराठमोळा लुक होता. मीच नाही तर त्याखेळात सहभागी झालेल्या माझ्या सहकलाकार मैत्रिणी तितक्याच उत्साहात तयार होऊन आल्या होत्या. एक वेगळीच वातावरण निर्मिती झाली होती, सर्वांचे हसण्याचे आवाज, फुगड्या, झिम्मा, मंगळागौरची गाणी, कोण चुकत होत, कोणी एकदम उत्तम खेळत होतं, स्पर्धा ही लागल्या होत्या. खूप मज्जा येत होती. या नवदांपत्याच्या मंगळागौरीच्या निमित्ताने संपूर्ण कुटुंब एकत्र आलं होतं. तसेच काही नवीन सदस्य देखील सहभागी झाले होते. सूर्यादादाच्या परिवाराला पहिल्यांदा भेटले,  वसुंधराला मी पहिल्यांदा भेटले. पण, अक्षया आणि माझी फार जुनी ओळख आहे. माझ्या पहिल्या मालिकेत तिने माझ्या बहिणीची भूमिका साकारली होती. आमच्या मैत्रीला किमान ८ वर्ष झाली असतील, तिला भेटून मला सगळ्यात जास्त आनंद झाला. त्याच बरोबर अप्पी अमोलची धमाल-मस्ती बघयला मज्जा येत होती. अप्पी आणि माझी एकदम गट्टी आहे. कारण, आमच्या मालिका एकत्र आल्या होत्या. तर, आमचे छान विनोद आणि मस्ती चालू होती. असं वाटत होतं की, एका वर्गात मस्तीखोर मुली जमा झाल्या आहेत आणि मास्तरीण बाई त्यांना सांभाळायचा प्रयत्न करत आहेत.’ 

सगळ्यांना भेटून आनंद झाला!

शिवानी नाईक म्हणाली की, ‘ही नवदांपत्यांची मंगळागौर होती. खूप मज्जा आली. या आधी मी कधीच मंगळागौर खेळले नव्हते. मी कार्यक्रमांना उपस्थित राहिलेय. पण, खेळायचा योग कधी जुळून आला नव्हता. खूप भारी अनुभव होता, सगळ्याजणी इतक्या गोड दिसत होत्या. मंगळागौरचा जो संघ आला होता आमच्या बरोबर खेळायला आला होता. त्यांनी आमच्याकडून इतक्या उत्तम आणि सुंदरपणे खेळ करून घेत होत्या. मला असं वाटतं, मंगळागौर एक फिटनेसचा भाग आहे आणि आपल्या संस्कृतीतल्या अशा गोष्टी आपणच जपल्या पाहिजेत. मला सर्वाना भेटून खरंच खूप आनंद झाला. कार्यक्रम संपत आला तेव्हा असं वाटत होतं, अजून थोडा वेळ मिळाला हवा होता.’

TMKOC: जुन्या तारक मेहताच्या तुलनेत नव्याला मिळतेय अगदीच चिल्लर फी! आकडा वाचून तुम्हालाही वाटेल आश्चर्य

सगळ्या कलाकारांशी भेट आणि गप्पा झाल्या!

अक्षया हिंदाळकरने सांगितले की, ‘मालिकेच्या निमित्ताने माझी ही पहिली मंगळागौर होती. माझ्यासाठी खूपच नवीन अनुभव होता. मला सर्वात जास्त आकर्षक वाटलं ते म्हणजे सगळे खेळ. मी आणि आकाशने पहिल्यांदा फुगडी घातली. उखाण्याचा खेळ किंवा माझी आई मोठी की तुझी आई मोठी सर्वच खेळ मस्त होते. माझी आणि शिवाची तब्बेत थोडी नरम होती. पण, आम्ही त्या खेळांमध्ये भान हरपून रमलो होतो. फुगडी अशी पाहायला गेलो, तर सोप्पी वाटते. पण, ती घालताना माझी कसरत झाली. सगळ्या कलाकारांशी भेट आणि गप्पा झाल्या. तितिक्षाला इतक्या वर्षांनी भेटून खूप आनंद झाला. खूप मज्जा केली आम्ही दोघींनी. वल्लरी आणि पूर्वाला भेटून छान वाटलं एकंदरीत सर्वांसोबत वेळ कसा गेला कळलंच नाही.’

वल्लरी विराज म्हणाली की,‘माझा मंगळागौरीचा हा पहिलाच अनुभव होता. पण मला वेग वेगळ्या प्रकारच्या फुगड्या घालण्यात खूप मज्जा आली. माझ्या गप्पा सर्वात जास्त अप्पी, शिवा आणि वसुंधराशी जमल्या होत्या असं वाटलंच नाही की, आम्ही पहिल्यांदा भेटत होतो. त्रिफुला फुगडी, बस फुगडी, फुलपाखरू असे अनेक खेळ होते आणि ते खेळण्यात कस लागला. पण मज्जा ही तितकीच आली. माझ्यासोबत एजेसुद्धा खेळात सहभागी झाले होते.’ 

मंगळागौरचे खेळ म्हणजे एक प्रकारचा कार्डिओ!

पूर्वा कौशिकने म्हटलं की, ‘मी मंगळागौर कधी खेळली नाहीये. सर्व मैत्रिणींबरोबर मी पहिल्यांदा मंगळागौरचे खेळ खेळले. खूप भन्नाट वाटलं. या निमित्ताने मला एक गोष्ट पदोपदी जाणवली ती म्हणजे आपल्या पणजी, आजी आणि आई कशा इतक्या स्फुर्तीने सर्व काम करायच्या. या सर्वजणी असे खेळ खेळल्या आहेत. हा खेळ खेळण्यासाठी एक वेगळी ऊर्जा लागते, जी त्या पिढीमध्ये निर्माण झाली आहे. मला हे कळलं की, आमची का लगेच कंबर दुखते. मंगळागौरचे खेळ म्हणजे एक प्रकारचा कार्डिओ आहे आणि आमच्या सोबत असलेला मंगळागौरचा तो संघ बिलकुल थकत नव्हता. पण माझी दमछाक झाली. मला कौतुक आहे त्या पिढीच कारण साठ-सत्तर वयात ही त्या इतक्या तंदरुस्त आहेत. मी एक गोष्ट शिकले की, माझं शरीर निरोगी राहावं म्हणून व्यायाम हा प्रकार खूप गरजेचा आहे.’

विभाग