Manasi Naik Divorce: मराठी मनोरंजन विश्वातली ऐश्वर्या राय अर्थात अभिनेत्री मानसी नाईक वेगवेगळ्या कारणांमुळे सोशल मीडियावर चर्चेत असते. गेल्या काही दिवसांपूर्वी मानसी नाईक हिने आपण घटस्फोट घेत असल्याचे म्हणत सगळ्यांनाच धक्का दिला होता. यानंतर मानसी नाईक आणि तिचा पती प्रदिप खरेरा यांच्यातील वाद देखील सोशल मीडियावर चर्चेत आले होते. गेल्या काही काळापासून त्यांच्यातील घटस्फोटाची प्रक्रिया सुरू होती. दरम्यान, आता अभिनेत्रीला घटस्फोट मिळाला आहे. घटस्फोट मिळाल्यानंतर आता तिने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत, एका नव्या आयुष्याची सुरुवात करत असल्याचे म्हटले आहे.
मानसी नाईक हिने काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर प्रदीप खरेरा याला अनफॉलो केल्यापासून घटस्फोटाच्या चर्चांना उधाण आले होते. यानंतर मानसी नाईक हिने यावर भाष्य करत घटस्फोट घेत असल्याच्या चर्चेला दुजोरा दिला होता. यावेळी तिने घटस्फोटाचं कारण देखील स्पष्ट केलं होतं. ’मी खरंच घटस्फोटासाठी अर्ज दाखल केलाय’, अशी कबुली तिने दिली होती. आता तिने एक पोस्ट शेअर करून आपल्याला घटस्फोट मिळाल्याचे सांगितले आहे. यासोबत तिने आता आपण आपल्या आयुष्याची नव्याने सुरुवात करत असल्याचे तिने म्हटले आहे. यासोबत तिने स्वतःचे काही फोटो देखील शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये मानसी नाईक खूप आनंदी आणि खूश दिसत आहे.
मानसी नाईक हिने नुकतेच पॅरिसच्या आयफेल टॉवरसमोर केलेलं फोटोशूट शेअर केलं आहे. यात तिने म्हटले की, ‘मी आता भूतकाळामधील सगळ्या गोष्टींमधून मुक्त झाले आहे. प्रत्येक पाऊल पुढे टाकताना माझं बळ वाढत आहे. जुन्या गोष्टींना निरोप आणि आयुष्यातील पुढच्या वाटचालींचं स्वागत. भूतकाळामध्ये रमून राहण्यासाठी आयुष्य खूप लहान आहे. मी फक्त वर्तमान आणि भविष्यासाठी जगते. या संपूर्ण प्रवासामध्ये माझ्या पाठिशी जे खंबीरपणे उभे राहिले त्यांचे मनापासून आभार. आयुष्याची नवी सुरुवात’. या पोस्टसोबत मानसीने ‘डिवोर्स जर्नी, फायनली ऑल ओव्हर, खूप आनंदी, नवी सुरुवात’ असे हॅशटॅग दिले आहेत.
घटस्फोटाचं कारण सांगत मानसी नाईक म्हणाली की, ‘सगळं काही खूपच जलद गतीने घडलं. परंतु, आजही माझा प्रेमावर विश्वास आहे. मला पुन्हा प्रेम करायचं आहे. माझ्या आयुष्यात एक वेळ अशी होती, जेव्हा मला स्वतःच कुटुंब हवं होतं आणि म्हणूनच मी लग्न केलं. हे सगळं खूपच घाईघाईत झालं. मला वाटतं ही घाईच माझ्यासाठी बाधक ठरली. या नात्यातून वेगळं होण्याची वेळ आता आली आहे. त्याच्याबद्दल आणि त्याच्या कुटुंबाबद्दल मला कायम आदर आहे. पण एक स्त्री म्हणून माझा स्वाभिमान महत्त्वाचा आहे. एखादी व्यक्ती एवढ्या खालच्या थराला जाऊ शकते हे समजून घेणं माझ्यासाठी आवश्यक होतं.’
संबंधित बातम्या