सध्याच्या घडीला मराठी चित्रपटसृष्टीमधील अतिशय लोकप्रिय अभिनेत्री म्हणून प्रिया बापट ओळखली जाते. तिने नाटक, मालिका आणि चित्रपटांमध्ये काम करत प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. तसेच तिची 'सिटी ऑफ ड्रीम' ही वेब सीरिज विशेष गाजली. एक उत्तम अभिनेत्री असण्यासोबतच प्रिया खूप स्पष्टवक्तव्य करणारी अभिनेत्री आहे. ती कायमच ठोस भूमिका घेताना दिसते. नुकताच एका मुलाखतीमध्ये प्रियाने तिच्या सोबत घडलेला धक्कादायक प्रकार सांगितला आहे. या मुलाखतीमध्ये तिने दादरमध्ये तिच्यासोबत गैरवर्तन झाल्याचे सांगिते.
प्रियाने 'हॉटरफ्लाय'ला नुकतीच मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिने २०१० साली तिच्यासोबत घडलेला प्रकार सांगितला. ही घटना दादरमध्ये राहात असलेल्या घराच्या समोरच्या गल्लीमध्ये घडली होती. 'मी शुटिंग संपवून घरी परतत होते. माझ्या एका हातात पिशव्या होत्या आणि एका हाताने मी फोन कानाला लावला होता. जवळपास माझे दोन्ही हात व्यस्त होते. तेवढ्यात समोरुन एक माणूस आला. त्याने माझे स्तन पकडले आणि तो पटकन तेथून पळून गेला. माझ्यासोबत काय घडले आहे हे मला कळायला जवळपास तीन सेकंद लागले. मी तेथे तशीच स्तब्ध उभी होते. मला काहीच कळत नव्हते नेमके काय झाले आहे. मी मागे वळून पाहिले तर ती व्यक्ती तेथून पळून गेली होती. ती कुठेच मला दिसत नव्हती' असे प्रिया म्हणाली.
वाचा: मराठमोळ्या अभिनेत्रीने ऑस्ट्रेलियात साजरी केली होळी, पाहा व्हिडीओ
त्यानंतर रडत प्रिया घरी गेली. घरी तिची आई नव्हती. त्यामुळे वडिलांना कसे सांगावे असा प्रश्न देखील तिला पडला होता. 'मी घरी गेले तेव्हा दुर्दैवाने आई तिथे नव्हती. बाबा घरात होते. पण मला कळत नव्हते की मी घडलेला प्रकार बाबांना कसा सांगावा. मी रडत होते. शेवटी त्यांनी मला झालय काय? असा प्रश्न विचारला. तेव्हा मी त्यांना घडलेला प्रकार सांगितला. मी जेव्हा त्यांच्याकडे पाहिले तेव्हा ते रागाने लाल झाले होते. त्यांना काय करावे हे सुचत नव्हते. मी त्या व्यक्तीला शोधून काढेन किंवा त्याला मारेन असे माझे बाबा म्हणाले नाहीत. कारण ते त्या व्यक्तीला शोधणार तरी कसे होते' असे प्रिया पुढे म्हणाली.
वाचा: सिद्धार्थ जाधवचं नशीब फळफळलं, 'या' हॉलिवूड सिनेमात साकारणार भूमिका
प्रियाने सांगितलेला प्रकार ऐकून सर्वांनाच धक्का बसला. पुढे ती व्यक्ती सापडली की नाही असे देखील अनेकांच्या मनात प्रश्न आले असतील. पण त्या व्यक्तीचा थांगपत्ता लागू शकला नाही. प्रियाला त्या व्यक्तीने असे का केले असेल असा प्रश्न पुढे मुलाखतीमध्ये विचारण्यात आला. तेव्हा तिने, 'मला असे वाटते की त्या व्यक्तीला आनंद घ्यायचा असेल. रस्त्यावरुन एक महिला जाताना दिसत आहे. तिचे दोन्ही हात व्यस्त आहेत, त्यामुळे ती काही करु शकत नाही असे त्याला वाटले असेल. त्या व्यक्तीने परिस्थितीचा फायदा उचलला. या घटनेनंतर एखाद्या व्यक्तीची नजर वाईट असल्याचे मला जाणवले की ती व्यक्ती मला येऊन स्पर्श करते करते की काय असे मला सतत वाटते. त्या व्यक्तीला जाऊन पकडावे आणि मारावे अशी भावना माझ्या मनात येते' असे उत्तर दिले.
संबंधित बातम्या