Video: ड्रग्ज प्रकरणात अडकलेली ममता कुलकर्णी अखेर २५ वर्षांनी भारतात परतली, म्हणाली...
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Video: ड्रग्ज प्रकरणात अडकलेली ममता कुलकर्णी अखेर २५ वर्षांनी भारतात परतली, म्हणाली...

Video: ड्रग्ज प्रकरणात अडकलेली ममता कुलकर्णी अखेर २५ वर्षांनी भारतात परतली, म्हणाली...

Aarti Vilas Borade HT Marathi
Dec 05, 2024 01:00 PM IST

Video: ९० च्या दशकात 'करण अर्जुन', 'वक्त हमारा है', 'क्रांतिवीर', 'सबसे बड़ा खिलाडी', 'आंदोलन', 'बाजी' यांसारख्या चित्रपटांमध्ये काम करणारी अभिनेत्री ममता कुलकर्णी २५ वर्षांनंतर भारतात परतली आहे.

Mamta Kulkarni
Mamta Kulkarni

९० चा दशकातली बोल्ड आणि ब्युटीफुल अभिनेत्री म्हणून ममता कुलकर्णीची ओळख होती. तिने मेरा दिल तेरे लिये या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. ममताने कमी वेळात इंडस्ट्रीमध्ये स्वत:ची ओळख निर्माण केली होती. त्यानंतर ममता परदेशात स्थायिक झाली. आता जवळपास २५ वर्षांनंतर ममता भारतात परतली आहे. तिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये ती भारतात आल्यावर आनंदी असल्याचे दिसत आहे. नुकताच मुंबई उच्च न्यायालयाने अभिनेत्रीविरोधात २०१६ मध्ये दाखल केलेलाड्रग्ज तस्करीचा खटला रद्द केला आहे.

ममताने शेअर केला व्हिडीओ

ममताने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ममता बोलताना दिसत आहे की, "नमस्कार मित्रांनो, मी ममता कुलकर्णी आहे आणि मी २५ वर्षांनंतर भारतात, आमच्या मुंबईमध्ये परतले आहे. २००० साली सुरु झालेला माझा भारता बाहेरचा प्रवास आता संपला आहे. हा प्रवास आठवून मी भावूक झाले. आता २०२४मध्ये मी आनंदी आहे. काय बोलावले मला कळत नाही. मी भावूक झाले आहे."

या व्हिडीओमध्ये पुढे ममता म्हणाली, "विमान उतरण्यापूर्वी मी माझ्या आजूबाजूला पाहत होते. अनेक वर्षांनंतर मी माझ्या देशाकडे वरून पाहिलं आणि भावूक झाले. माझ्या डोळ्यात पाणी आले. मग जेव्हा मी आंतरराष्ट्रीय मुंबई विमानतळावर पाय ठेवला तेव्हा माझा आनंद गगनात मावेनासा झाला." ममताने हा व्हिडीओ शेअर करत 'मी २५ वर्षांनंतर मायदेशी परतली आहे. १२ वर्षांच्या तपश्चर्येनंतर. २०१२ च्या कुंभमेळ्यात मी सहभागी झाले होते आणि आता बरोबर १२ वर्षांनंतर मी २०२५ मध्ये होणाऱ्या महाकुंभासाठी परत आले आहे.'
वाचा: बॉलिवूडमधील 'हा' सिनेमा आहे छोटा राजनच्या जीवनावर आधारित? संजय दत्तने साकारली होती भूमिका

ममता कुलकर्णी विषयी

१९९३मध्ये, ममता सैफ अली खानसोबत "आशिक आवारा" चित्रपटात दिसली, ज्यासाठी तिला न्यू फेस अवॉर्ड मिळाला. आपल्या १० वर्षाचा कारकिर्दीत ममताने मोजकेच चित्रपट केले असले तरी, या दरम्यान ती तिच्या चित्रपटांपेक्षा इतर काँट्रोव्हर्सींसाठीच जास्त चर्चेत राहिली. तिने 'करण अर्जुन', 'वक्त हमारा है', 'क्रांतिवीर', 'सबसे बड़ा खिलाडी', 'आंदोलन' आणि 'बाजी' यांसारख्या चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका साकारल्या होत्या. पण १९९७ मध्ये बेकायदेशीर अंमली पदार्थांच्या तस्करीप्रकरणी तिला अटक झाली होती. जामीन मिळाल्यानंतर ममता दुबईमध्ये स्थायिक झाली. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने अभिनेत्रीविरोधात २०१६ मध्ये दाखल केलेला २००० कोटी रुपयांचा ड्रग्ज तस्करीचा खटला रद्द केला. कारण तिच्याविरोधात गोळा करण्यात आलेल्या पुराव्यांमधून गुन्हा सिद्ध झाला नव्हता.

Whats_app_banner