गेल्या काही दिवसांपासून 'येक नंबर' या चित्रपटाची जोरदार चर्चा रंगली आहे. हा चित्रपट राज ठाकरे यांचा बायोपिक असल्याचे म्हटले जात होते. पोस्टर प्रदर्शित झाल्यापासून या चित्रपटाची अनेकांना उत्सुकता लागलेली असतानाच ही उत्सुकता आणखी वाढवण्यासाठी या चित्रपटाचा जबरदस्त ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटात बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा देखील दिसणार असल्याचे म्हटले जात होते. आता चित्रपटातील एक गाणे प्रदर्शित झाले आहे. या गाण्यातील मलायकाचा जलवा पाहण्यासारखा आहे.
प्रेक्षकांकडून ‘येक नंबर’ चित्रपटाची चर्चा सुरु असताना भन्नाट शीर्षकगीत रिलिज झाले आहे. एनर्जीने भरलेल्या या गाण्याला अजय-अतुल यांचे संगीत आणि शब्द लाभले असून या जबरदस्त गाण्याला जोनिता गांधीचा आवाज लाभला आहे. तर रॅप सौरभ अभ्यंकर यांचे आहे. गणेश आचार्य यांचे नृत्यदिग्दर्शन लाभलेल्या या गाण्याची खासियत म्हणजे अवघ्या बॉलिवूडला भुरळ घालणारी मलायका अरोरा या गाण्याच्या माध्यमातून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करत आहे.
‘येक नंबर’ या रॅपसाँगमधून मलायका आपल्या अदाकारीने रसिकांना घायाळ करणार आहे आणि यात तिला साथ लाभणार आहे महाराष्ट्राचा लाडका अभिनेता सिद्धार्थ जाधवची. अशी तगडी टीम लाभलेले हे गाणे केवळ महाराष्ट्रातच नाही तर देशभरात धुमाकूळ घालणार असल्याचे दिसतेय.
हे आयटम साँग ऐकायला जितके एनर्जेटिक आहे तितकेच ते पाहायलाही कमाल आहे. प्रत्येकाला ठेका धरायला लावणाऱ्या या गाण्यात सिद्धार्थ एका अनोख्या अंदाजात दिसत आहे. मलायका आणि सिद्धार्थला एकत्र पडद्यावर पाहाणे, म्हणजे प्रेक्षकांसाठी पर्वणीच ठरणार आहे. खूप हॅपनिंग आणि एनर्जीने भरलेले हे गाणे प्रत्येकाच्या ओठांवर रुळणारे आहे.
वाचा: पतीच्या निधनानंतर खचून गेल्या होत्या नीना कुलकर्णी, आज दोन्ही मुले आहेत करिअरमध्ये यशस्वी
एकंदरच या सगळ्यावरूनच चित्रपटाच्या भव्यतेचा अंदाज येतोय. मराठी सिनेसृष्टीत अशा प्रकारचा चित्रपट बहुदा पहिल्यांदाच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 'येक नंबर'म्हणजे एक कौटुंबिक, रोमँटिक लव्हस्टोरी, सस्पेन्स असे मनोरंजनाचे परिपूर्ण पॅकेज आहे असे म्हणालायला हरकत नाही. हा चित्रपट १० ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे चाहत्यांमध्ये चित्रपटाची उत्सुकता वाढली आहे. 'येक नंबर'चे तेजस्विनी पंडित, वर्धा नाडियाडवाला निर्माते आहेत.