गेल्या काही दिवसांपासून 'एक डाव भूताचा' या चित्रपटाची जोरदार चर्चा रंगली आहे. या चित्रपटात सिद्धार्थ जाधव, मयूरी देशमुख आणि मकरंद अनासपुरे हे महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहेत. खरं तर या दोन विनोदी कलाकारांना एकत्र पाहणे म्हणजे एक पर्वणीच ठरणार आहे. आता या दोघांच्या 'एक डाव भूताचा' या चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. ट्रेलर पाहाता चित्रपटात काही तरी वेगळे पाहायला मिळणार असल्याचे म्हटले जात आहे.
'एक डाव भूताचा' या चित्रपटाच्या १ मिनिटे ५२ सेकंदाच्या ट्रेलरमध्ये स्मशानात जन्म झाल्यामुळे सतत भूत दिसणाऱ्या तरूणाची कथा दाखवण्यात आली आहे. हा तरुण एका मुलीच्या प्रेमात पडतो. तसेच मुक्ती मिळण्याच्या प्रतीक्षेत असलेलं एक भूत त्याच्याशी संपर्क साधते. हे भूत त्या तरुणाला जगू ही देत नाही. पण हे भूत त्याच्यासमोर एक अट ठेवते. जर त्या भूताला मुक्ती देण्यास मदत केली तर तो तरुणाच्या आयुष्यात आलेल्या तरुणीला पटवण्यास मदत करतो हे ट्रेलरमध्ये दाखवण्यात आले आहे.
एक भूत मुक्ती मिळवण्यासाठी एका तरुणाच्या आयुष्यात येतं. मुक्ती मिळवून देण्याच्या बदल्यात त्या तरुणाचं प्रेम असलेली तरुणी त्याला मिळवून देण्याचा डाव तरुण आणि भूत यांच्यात ठरतो. त्यामुळे भूताला मुक्ती मिळते का? तरुणाला त्याचं प्रेम मिळतं का ? याची धमाल गोष्ट "एक डाव भूताचा" या चित्रपटात आहे. या गोष्टीला प्रेमकथा, विनोदाची रंजक फोडणीही असून अभिनयाची जुगलबंदी या चित्रपटात आहे. ही सर्व धमाल चित्रपटाच्या ट्रेलरमध्येही दिसत असल्यानं चित्रपटाविषयीची उत्सुकता निश्चितच वाढली आहे.
वाचा: मद्यधुंद अवस्थेत रस्त्यावर झोपले अन्...; जाणून घ्या महेश भट्ट यांच्यासोबत नेमकं काय झालं होतं
चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन संदीप मनोहर नवरे यांनी केलं आहे. चित्रपटात अभिनेते मकरंद अनासपुरे, सिद्धार्थ जाधव यांच्यासोत नागेश भोसले, अक्षय कुलकर्णी, हर्षद नायबळ, मयूरी देशमुख, अश्विनी कुलकर्णी, नंदिनी वैद्य, वर्षा दांदळे यांच्या महत्वपूर्ण भूमिका आहेत. डॉ. सुधीर निकम आणि संदीप मनोहर नवरे यांनी पटकथा लेखन केले आहे. सुप्रसिद्ध गायक सोनू निगम, अवधूत गुप्ते, रोहित राऊत आणि गायिका आनंदी जोशी यांनी गाणी गायली आहेत. सिद्धार्थ जाधव, मकरंद अनासपूरे प्रमुख भूमिकेत असलेला हा चित्रपट ४ ऑक्टोबरला प्रदर्शित होणार.