'दृष्ट लागण्या जोगे सारे' हे गाणं ऐकलं किंवा टीव्हीवर लागलं की, डोळ्या समोर येतात ती नव्या संसाराच्या स्वप्न उराशी बाळगून प्रवास करणारं ट्रेनमधील ते नवं जोडपं... १९८६ साली प्रदर्शित झालेला सिनेमा आजही जस्साच्या तस्सा प्रेक्षकांचा लक्षात आहे. 'माझं घर माझा संसार' या चित्रपटातील अजिंक्य देवसोबत एक देखणी अभिनेत्री झळकली होती. मात्र ती अभिनेत्री कोण होती? ती पुढे कोणत्या चित्रपटात का दिसली? तिचे पुढे काय झालं? असे प्रश्न तुम्हाला पडले असतील. चला जाणून घेऊया...
'दृष्ट लागण्या जोगे सारे' या गाण्यात दिसलेली देखणी अभिनेत्री म्हणजे मुग्धा चिटणीस. मुग्धाने आपल्या पहिल्याच आणि एकमेव चित्रपटात सहजसाध्या अभिनयाने व सौंदर्याने प्रेक्षकांची मने जिंकली होती. मात्र मुग्धा ही मूळची अभिनेत्री नव्हतीच. तर ती मूळची एक लोकप्रिय कथाकथनकार होती.
मुग्धा चिटणीस यांचा जन्म १८ फेब्रुवारी १९६५ रोजी ठाणे येथे झाला. त्यांचे आईबाबा शुभा चिटणीस-अशोक चिटणीस दोघेही शिक्षक व प्रख्यात लेखक होते. मुग्धावर लहानपणापासून शिक्षण व साहित्यविषयक उत्तम संस्कार झाले. विविध क्षेत्रातील मोठमोठ्या व्यक्तींचा त्यांच्या घरी वावर असायचा. ठाण्याच्या बेडेकर विद्यामंदिर आणि के. जी. जोशी महाविद्यालयात त्यांचे शिक्षण झाले. शाळा कॉलेजपासूनच मुग्धा यांचा वाचन व कथाकथनाची आवड होती. अनेक स्पर्धा देखील त्यांनी जिंकल्या होत्या.
१९८१ ते १९८८ या काळात त्यांचे कथाकथनाचे महाराष्ट्रभरात जवळपास ३०० पेक्षा जास्त कार्यक्रम केले होते. त्यांचा चांगला नावलौकिक झाला होता. ऑल इंडिया रेडिओवरून त्यांचे कार्यक्रम प्रक्षेपित झाले होते. पु ल देशपांडे , सुधीर फडके, वि वा शिरवाडकर या सारखे दिग्गज साहित्यिक देखील मुग्धा यांच्या कथाकथनाचे चाहते होते. त्यांच्या कथाकथनाच्या कार्यक्रमाच्या ऑडिओ आणि व्हिडीओ कॅसेटही त्या काळात निघाल्या होत्या. त्या कॅसेटस गाजल्याही होत्या.
अशाच एका कथाकथनाच्या कार्यक्रमाला प्रख्यात दिग्दर्शक राजदत्त उपस्थित होते. तिच्या कथाकथनावर व एकंदरीत गोड व्यक्तिमत्वामुळे प्रभावित होऊन त्यांनी आपल्या चित्रपटासाठी तिची निवड केली. तो चित्रपट होता १९८६ सालचा 'माझं घर माझा संसार'. हा चित्रपट मुंबई जवळील डोंबिवली येथील घडलेल्या सत्यघटनेवर आधारित असल्याचं सांगण्यात येतं. या चित्रपटातील मुग्धाची भूमिका प्रचंड गाजली होती.
१९८८ साली त्यांनी उमेश घोडके यांच्याशी लग्न केले. या जोडप्याला इशा नावाची एक मुलगीही झाली. लग्नानंतर त्या काही काळासाठी अमेरिकेत वास्तव्याला होत्या. तिथेही त्यांनी कथाकथनाचे कार्यक्रम केले. शिवाय नाटकांतूनही काम केले. प्रख्यात अभिनेत्री किरण वैराळे यांनी अमेरिकन टीव्हीवर मुग्धा यांची मुलाखतही घेतली होती. सगळं काही सुरळीत सुंदर चालू होते. पण एक दिवस अचानक दृष्ट लागल्यासारखे काही तरी घडले.
५ डिसेंबर १९९४ रोजी मुग्धा यांना कर्करोग असल्याचे निदान झाले. दोन वर्षे या आजाराशी झुंज देऊन १० एप्रिल १९९६ रोजी म्हणजे वयाच्या केवळ ३१ व्या वर्षी त्यांचे निधन झाले.