Rakhi Sawant Reaction on Deepika’s Baby: बॉलिवूडचं लाडकं कपल दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह यांच्या घरी मुलीच्या रूपाने लक्ष्मी आली आहे. अभिनेत्रीने ८ सप्टेंबर रोजी मुंबईतील रिलायन्स रुग्णालयात मुलीला जन्म दिला. ही बातमी समोर येताच चाहत्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही आणि सर्वांनी दीपिका व रणवीर सिंहचे अभिनंदन केले. यावेळी अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनीही दीपिका-रणवीरचे अभिनंदन केले. आता राखी सावंतनेही दीपिका पादुकोणच्या आई होण्यावर तिची प्रतिक्रिया दिली आहे. एवढेच नाही तर, राखीने दीपिकाच्या मुलीसाठी काही भेटवस्तूही खरेदी केल्या आहेत.
दुबईत असलेल्या राखी सावंतने दीपिका पादुकोणच्या मुलीसाठी काही भेटवस्तू खरेदी केल्या आहेत. सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करताना तिने आपण दिपिकासाठी खूप आनंदी झाल्याचे म्हटले आहे. राखी सावंत व्हिडीओमध्ये म्हणाली की, ‘हॅलो रणवीर सिंह. दीपिका, मी मावशी झाली आहे. दीपिका तुला आठवतं का? आपण एकत्र डान्स क्लासला जायचो. एकत्र करिअरला सुरुवात केली. तू मोठी स्टार झालीस. मग तू बायको झालीस आणि आता आई पण झाली आहेस.’
या व्हिडीओमध्ये पुढे बोलताना राखी सावंत म्हणाली की, दीपिका मी ही बाहुली तुझ्या मुलीसाठी विकत घेत आहे. इतकंच नाही, तर राखी व्हिडीओमध्ये आणखी गिफ्ट्स दाखवते आणि म्हणते की दीपिका, मी सध्या दुबईत आहे, मी तुझ्या बाळासाठी हे सर्व गिफ्ट लवकरच पाठवत आहे.
एक पोस्ट शेअर करून दीपिका आणि रणवीर या जोडीने अधिकृतपणे त्यांच्या चाहत्यांना सांगितले होते की, त्यांच्या घरी मुलीचा जन्म झाला आहे. रणवीर-दीपिकाने पोस्टमध्ये लिहिले होते की, ‘स्वागत आहे बाळा! मुलगी झाली! ८.९.२०२४ दीपिका आणि रणवीर.’ ही पोस्ट सोशल मीडियावर तुफान गाजली आणि काही मिनिटांतच व्हायरल झाली. दीपिका आणि रणवीरच्या या खास पोस्टवर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडला. मग ते चाहते असोत, जवळचे मित्र असोत आणि अगदी बॉलिवूड सेलिब्रिटी असोत, सर्वांनीच दीपवीरचे अभिनंदन केले.
रणवीर सिंहच्या या पोस्टवर अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. प्रियांका चोप्रानेही रणवीर आणि दीपिकाचे अभिनंदन केले. या यादीत श्रद्धा कपूर, परिणीती चोप्रा, अर्जुन कपूर, मलायका अरोरा यांसारख्या कलाकारांच्या नावांचा समावेश आहे. यासोबतच बॉलिवूडच्या इतर कलाकारांनीही रणवीर आणि दीपिकाला या आनंदाच्या प्रसंगी शुभेच्छा दिल्या आहेत.