Happy Birthday Mahesh Manjrekar: आपल्या आयुष्याच्या मार्गावर आलेले ‘काटे' कुणाला बरं आवडतात? प्रत्येक जण असे काटे आयुष्यातून काढून टाकायच्या मागे लागलेला असतो. मात्र, मनोरंजन विश्वात एक असं व्यक्तिमत्व आहे, ज्यांच्या आयुष्यात 'काटे' आले आणि त्यांचं आयुष्य पूर्णपणे बदलूनच गेलं. ही व्यक्ती आहे हिंदी-मराठी मनोरंजन विश्व गाजवणारे प्रसिद्ध दिग्दर्शक, लेखक आणि अभिनेते महेश मांजरेकर. त्यांनी सिनेसृष्टीत सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाची जागा तर मिळवलीच, पण एक उत्तम अभिनेताही बनले. आज (१६ ऑगस्ट) महेश मांजरेकर त्यांचा वाढदिवस साजरा करत आहेत. यानिमित्ताने जाणून घेऊया त्यांच्या आयुष्यातील काही खास गोष्टी...
महेश मांजरेकर हे मुळचे मुंबईचे. १६ ऑगस्ट १९५८ रोजी मुंबईत जन्मलेले महेश मांजरेकर हे मराठी कऱ्हाडे कुटुंबातील आहेत. महेश यांचे लहानपणापासूनच सिनेविश्वात प्रवेश करण्याचे स्वप्न होते. मात्र, त्यांना अभिनेता व्हायचे नव्हते, तर दिग्दर्शक म्हणून करिअर करण्याची त्यांची इच्छा होती. परंतु, त्यांनी दूरदर्शनच्या मराठी नाटकातून अभिनेता म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. महेश मांजरेकर यांनी १९९९मध्ये ‘वास्तव’ हा चित्रपट बनवून आपले दिग्दर्शक होण्याचे स्वप्न पूर्ण केले होते. त्या काळातील या सुपरहिट चित्रपटातील एका गाण्यात महेश मांजरेकर स्वतः झळकले देखील होते. यानंतर महेश मांजरेकर यांनी ‘अस्तित्व’, ‘कुरुक्षेत्र’, ‘जिस देश में गंगा रहता है’, ‘तेरा मेरा साथ रहे’ यासह अनेक उत्कृष्ट चित्रपटांचे दिग्दर्शन केले.
स्वत:च्याच चित्रपटांमध्ये अनेकदा छोट्या भूमिका करणाऱ्या महेश मांजरेकर यांनी त्यांच्या ‘कांटे’ या चित्रपटात राजा बळी यादव ही भूमिका साकारली. या भूमिकेने आणि चित्रपटाने महेश मांजरेकर यांच्या करिअरला कलाटणी दिली. या चित्रपटानंतर त्यांच्या अभिनयाचे सर्वत्र कौतुक होऊ लागले. म्हणूनच महेश मांजरेकर यांनी अभिनयात देखील विशेष रस घ्याला सुरुवात केली. महेश मांजरेकर एक अभिनेता म्हणून ‘स्लमडॉग मिलेनियर’, ‘दबंग’, ‘रेडी’, ‘बॉडीगार्ड’, ‘वहर’, ‘विरुध्द’, ‘केसरी’, ‘बाजीराव मस्तानी’, ‘मी शिवाजीराजे भोसले बोलतोय’, ‘दे धक्का २’, ‘काकस्पर्श’, ‘मुसाफिर’ आणि ‘जुनं फर्निचर’ इत्यादी चित्रपटांमध्ये दिसले आहेत. मात्र, एका मुलाखतीत त्यांनी आपल्या भावना व्यक्त करताना अभिनयापेक्षा दिग्दर्शनात जास्त रस असल्याचे सांगितले होते. परंतु, अभिनयामुळेच इंडस्ट्रीत वेगळी ओळख निर्माण झाली, याची कबुलीही त्यांनी दिली.
महेश मांजरेकर यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगायचे तर, त्यांनी १९८७मध्ये कॉस्च्युम डिझायनर दीपा मेहताशी लग्न केले. परंतु, १९९५मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. यानंतर महेशच्या आयुष्यात मेधा मांजरेकर यांची एन्ट्री झाली. १९९५मध्ये महेश मांजरेकर यांनी मेधा यांच्याशी लग्नगाठ बांधली. महेश मांजरेकर यांना तीन अपत्ये आहेत.