मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Ambar Kothare Passed Away: ज्येष्ठ रंगकर्मी अंबर कोठारे यांचे निधन; ९६व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Ambar Kothare Passed Away: ज्येष्ठ रंगकर्मी अंबर कोठारे यांचे निधन; ९६व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Harshada Bhirvandekar HT Marathi
Jan 21, 2023 01:47 PM IST

Ambar Kothare Passed Away: अभिनेते महेश कोठारे यांचे वडील, नाट्य-चित्रपट निर्माते अंबर कोठारे यांचे वृद्धापकाळाने मुंबईत निधन झाले.

Ambar Kothare
Ambar Kothare

Ambar Kothare Passed Away: ज्येष्ठ रंगकर्मी, अभिनेते, नाट्य-चित्रपट निर्माते अंबर कोठारे (वय ९६) यांचे आज सकाळी वृद्धापकाळाने मुंबईत निधन झाले. कोठारे यांच्या पार्थिवावर बोरिवली येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या मागे पत्नी जेनमा, पुत्र आणि प्रसिद्ध निर्माते-दिग्दर्शक महेश कोठारे, नातू आदिनाथ कोठारे असा परिवार आहे.

अंबर कोठारे हे अभिनेते महेश कोठारे यांचे वडील होते. महेश कोठारे यांचा जन्म १४ एप्रिल १९२६ रोजी मुंबईत झाला होता. अंबर कोठारे स्वतः देखील रंगकर्मी आहेत. त्यांचे बालपण अत्यंत कष्टात गेले. घरची आर्थिक परिस्थिती बिकट असल्यामुळे कोठारे यांना वेगवेगळी कामे करावी लागली. दिवाळीच्या काळात गिरगावात रस्त्यावर उटणे विकण्याचेही काम त्यांनी काही काळ केले होते. कालांतराने शिक्षण पूर्ण करून त्यांनी ‘ब्रिटिश बॅंक ऑफ दि मिडल इस्ट’ या बॅंकेत त्यांनी नोकरी केली. तब्बल चार दशके त्यांनी या बॅंकेत वेगवेगळ्या पदांवर काम केले. या बॅंकेचे भारतातर्फे प्रतिनिधीत्व करण्याचीही संधी त्यांना मिळाली होती.

अंबर कोठारे म्हणजे बहुरंगी व्यक्तिमत्त्व. नोकरी सांभाळत त्यांनी आपली रंगभूमीची आवडदेखील जोपासली. प्रायोगिक रंगभूमीवर त्यांनी दीर्घ काळ काम केले. ‘इंडियन नॅशनल थिएटर’ (आयएनटी) या संस्थेच्या मराठी विभागाचे ते पहिले सचिव होते. या संस्थेतर्फे त्यांनी बरीच नाटके रंगभूमीवर सादर केली. ‘झोपी गेलेला जागा झाला’ या नाटकाचे त्यांनी शेकडो प्रयोग सादर केले होते. काही नाटकांमध्ये त्यांनी अभिनयदेखील केला होता. ‘झुंजारराव’ नाटकामधील त्यांची भूमिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली होती. अंबर कोठारे यांनी उत्तम नाटकांची निर्मितीही केली होती. त्यापैकी एक प्रमुख नाटक म्हणजे ‘जेथे जातो तेथे’. या नाटकाच्या लेखनासाठी कोठारे यांनी प्रख्यात लेखक दत्ता भट यांना नाशिकवरून मुंबईत निमंत्रित केले होते. या नाटकामध्ये दत्ता भट यांच्यासोबतच अंबर कोठारे यांनीदेखील अभिनय केला होता.

प्रसिद्ध अभिनेते-निर्माते-दिग्दर्शक महेश कोठारे यांच्या बालकलाकार तसेच कालांतराने निर्माता-दिग्दर्शक म्हणून झालेल्या जडणघडणीत अंबर कोठारे यांचे मोलाचे योगदान होते. महेश कोठारे यांची निर्मिती-दिग्दर्शन क्षेत्रामधील पदार्पण असलेला ‘धुमधडाका’ हा चित्रपट सर्वतोपरी चांगला होण्यासाठी अंबर कोठारे यांनी भरपूर कष्ट घेतले होते. त्यानंतर महेश कोठारे यांच्या प्रत्येक चित्रपटामध्ये त्यांचा सक्रिय सहभाग होता. ‘दे दणादण’ या चित्रपटामध्ये अंबर कोठारे यांनी खलनायकाची व्यक्तिरेखा अत्यंत ताकदीने साकारली होती. त्यानंतर महेश कोठारे यांनी दिग्दर्शित केलेल्या काही महत्त्वाच्या कलाकृतींमध्येहीदेखील त्यांनी वेगवेगळ्या भूमिका साकारल्या होत्या.

IPL_Entry_Point