मराठी चित्रपट सृष्टीतील बहुचर्चित आणि गाजलेल्या जोड्यांपैकी एक म्हणजे अभिनेते महेश कोठारे आणि अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे. या जोडीने मनोरंजन विश्वाला अशी भुरळ पाडली की, पुढच्या अनेक पिढ्या देखील त्यांची ही धमाल कायम लक्षात ठेवतील. या जोडीने जे चित्रपट केले, ते मोठ्या पडद्यावर नेहमीच हिट ठरले. ‘खबरदार’, ‘झपाटलेला’, ‘धडाकेबाज’, ‘धुमधडाका’ अशा अनेक चित्रपटांमध्ये या दोघांनी मिळून प्रेक्षकांचं भरपूर मनोरंजन केलं. महेश कोठारे यांचा चित्रपट म्हटला की, त्यामध्ये लक्ष्मीकांत बेर्डे झळकणार हे ठरलेलं समीकरण असायचं. ‘इन्स्पेक्टर महेश’ आणि ‘लक्ष्या’ अशी ही जोडी अनेक वर्ष मोठ्या पडद्यावर राज्य करत होती. मात्र, लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या निधनामुळे ही जोडी तुटली.
गेली अनेक वर्ष लक्ष्याच्या आठवणीत महेश कोठारे यांनी नेहमीच काही ना काहीतरी नव्या गोष्टी केल्या. मात्र, आता महेश कोठारे यांनी कमालच केली आहे. आपल्या प्रत्येक चित्रपटात नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करणारे महेश कोठारे आता या एआय या तंत्रज्ञानाचा वापर करून, पुन्हा एकदा लक्ष्मीकांत बेर्डे यांना मोठ्या पडद्यावर आणणार आहेत. याचाच अर्थ पुन्हा एकदा प्रेक्षकांना लक्ष्या आणि महेश या जोडीची धमाल मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. नव्याने विकसित झालेल्या एआय तंत्रज्ञानामुळे आज जगात अनेक गोष्टी करणे सोपे झाले आहे. याच तंत्रज्ञानाचा वापर करून आता आपण लक्ष्याला पुन्हा एकदा चित्रपटाच्या पडद्यावर दाखवणार असल्याचं महेश कोठारे यांनी त्यांच्या एका नव्या मुलाखतीत बोलून दाखवलं आहे.
लक्ष्या आणि महेशची जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांचे मनोरंजन करणार हे ऐकताच त्यांच्या चाहत्यांना आनंद झाला आहे. या जोडीची धमाल पुन्हा एकदा अनुभवण्यासाठी त्यांचे चाहते आतुर झाले आहेत. याबद्दल बोलताना महेश कोठारे म्हणाले की, ‘लक्ष्मीकांत हा माझा अतिशय जवळचा मित्र होता आणि तो नेहमीच राहील. आज तो या जगात नसला, तरी माझ्याबरोबर नेहमीच आहे आणि तो नेहमीच मला मार्गदर्शन करतो. मला नेहमी वाटतं की, तो माझ्या आजूबाजूलाच आहे. लक्ष्मीकांत आणि मी खूप चित्रपट एकत्र केले. त्याचे अनेक बहुतेक माझ्याबरोबरच होते. त्यामुळे आमचं नातंच वेगळं होतं.’
पुढे महेश कोठारे म्हणाले की, ‘धुमधडाका, झपाटलेला, पछाडलेला, थरथराट अशा अनेक चित्रपटात आम्ही एकत्र काम केले. मात्र पछाडलेला हा चित्रपट आमचा एकत्र असा शेवटचा ठरला. पछाडलेला प्रदर्शित झाला आणि त्याच वर्षी लक्ष्या गेला. मात्र, आता मला पुन्हा एकदा त्याच्यासोबत काम करायची इच्छा आहे आणि म्हणूनच मी एआय तंत्रज्ञानाचा वापर करून लक्ष्मीकांतला रिक्रिएट करण्याचा प्रयत्न करणार आहे. या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मी लक्ष्याला मोठ्या पडद्यावर आणणारच, हे तर मनाशी पक्कं केलं आहे.’ आता महेश कोठारे यांच्या या निर्णयामुळे त्यांचे चाहते चांगलेच खुश झाले आहेत. दोघांची जोडी आता कुठल्या प्रोजेक्टमध्ये पाहायला मिळणार, याची आतुरता सगळ्यांनाच लागून राहिली आहे.
संबंधित बातम्या