मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  'माहेरची साडी'नंतर विजय कोंडके घेऊन येणार नवा सिनेमा, ३४ वर्षानंतर पुनरागमन

'माहेरची साडी'नंतर विजय कोंडके घेऊन येणार नवा सिनेमा, ३४ वर्षानंतर पुनरागमन

Aarti Vilas Borade HT Marathi
Mar 28, 2024 02:39 PM IST

मराठी प्रेक्षकांची अभिरुची ओळखून त्यानुसार यशस्वी चित्रपट निर्मिती करण्याची गुरुकिल्ली माहीत असलेले विजय कोंडके नवा चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.

'माहेरची साडी'नंतर विजय कोंडके घेऊन येणार नवा सिनेमा, ३४ वर्षानंतर पुनरागमन
'माहेरची साडी'नंतर विजय कोंडके घेऊन येणार नवा सिनेमा, ३४ वर्षानंतर पुनरागमन

मराठी चित्रपटसृष्टीमधील हिट चित्रपटांच्या नावाची चर्चा सुरु झाली की सर्वात आधी 'माहेरची साडी' या चित्रपटाचा आवर्जुन उल्लेख केला जातो. या चित्रपटात अभिनेत्री अलका कुबल मुख्य भूमिकेत दिसल्या होत्या. तसेच त्यांच्यासोबत अजिंक्य देव, रमेश भाटकर, विक्रम गोखले, विजय चव्हाण हे कलाकार होते. या चित्रपटाने त्यावेळी कमाईच्या बाबतील 'शोले' चित्रपटालाही मागे टाकले होते. 'माहेरची साडी' हा चित्रपट १९९१ साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन विजय कोंडके यांनी केले होते. त्यांच्या दिग्दर्शनची त्यावेळी विशेष चर्चा रंगली होती. आता विजय कोंडके यांचा एक नवा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये उत्सुकता पाहायला मिळते.

ज्येष्ठ दिग्दर्शक विजय कोंडके यांचे नाव जरी घेतले तरी 'माहेरची साडी' हा चित्रपट डोळ्यांसमोर येतो. या चित्रपटाने केलेली कमाई सर्वाधिक होती. निर्मिती, वितरण आणि दिग्दर्शन अशी तिहेरी भूमिका पेलवत विजय कोंडके यांच्या या मराठी चित्रपटाने यशाचे शिखर गाठले होते. तसेच लोकप्रियतेचे नवे मापदंड निर्माण केले होते. 'माहेरची साडी' या चित्रपटाच्या यशानंतर निर्माता-दिग्दर्शक विजय कोंडके आता जवळपास ३४ वर्षानंतर पुन्हा एकदा नव्या मराठी चित्रपटाची घोषणा करत आहेत.
वाचा: आदिती राव हैदरी आणि सिद्धार्थने गुपचूप केले लग्न?

काय आहे विजय कोंडकेंच्या आगामी चित्रपटाचे नाव

विजय कोंडके यांची निर्मिती आणि दिग्दर्शन असलेल्या नव्या चित्रपटाचे नाव 'लेक असावी तर अशी' असे आहे. हा मराठी चित्रपट २६ एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'ज्योती पिक्चर्स' निर्मित हा चित्रपट प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची चांगलीच मेजवानी असणार आहे.

विजय कोंडके यांच्या चित्रपटाविषयी

दादा कोंडके यांच्या 'सोंगाड्या', 'पांडू हवालदार', 'बोट लावीन तिथं गुदगुल्या', 'तुमचं आमचं जमलं', 'राम राम गंगाराम', 'आली अंगावर' यांसारख्या अनेक यशस्वी चित्रपटांच्या वितरणामध्ये विजय कोंडके यांचा मोलाचा वाटा राहिला आहे. मराठी प्रेक्षकांचा रस कशात आहे हे ओळखून त्यानुसार चित्रपटांची निर्मिती करणे हे विजय कोंडके यांना योग्य पद्धतीने जमले होते. आता त्यांचा 'लेक असावी तर अशी' हा कौटुंबिक चित्रपट प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी येण्यास सज्ज झाला आहे.
वाचा: १२-१३ तास सलग रडतेय; आशुतोषसाठी अरुंधतीची भावनिक पोस्ट

विजय कोंडके यांनी या चित्रपटाविषयी भावना व्यक्त केल्या आहेत. ते म्हणाले, "निर्माते-वितरक म्हणून स्वत:ची ओळख निर्माण केल्यानंतर आपणही कधीतरी दिग्दर्शकाच्या खुर्चीत बसून आपल्या मनातील सिनेमा बनवण्याच्या इच्छेतून आणि दादा कोंडके यांनी दिलेल्या संधीमुळे मी ‘माहेरची साडी’ या चित्रपटाच्या दिग्दर्शनाचे शिवधनुष्य उचलले. यशापलीकडे या चित्रपटाने मला रसिकांचे अमाप प्रेमही मिळवून दिले. रसिकांच्या याच प्रेमापोटी 'लेक असावी तर अशी' हा नवा मराठी चित्रपट मी २६ एप्रिलला घेऊन येतोय."

IPL_Entry_Point