Marathi Actress Vanita Kharat : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेत्री वनिता खरात सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय आहे. आपल्या अभिनयाने अवघ्या मराठी प्रेक्षकांना खळखळवून हसवणारी वनिता खरात हिने सुमित लोंढे याच्याशी लग्नगाठ बांधली होती. नुकतंच त्यांच्या लग्नाला एक वर्ष पूर्ण झालं आहे. या निमित्ताने वनिता खरात हिने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक खास पोस्ट शेअर केली आहे. यात तिने पतीला लग्नाच्या वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा दिल्या आहेत.
पती सुमित लोंढे याला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना वनिता खरात हिने आपल्या लग्नातील एक फोटो सोशल मीडियावर पुन्हा एकदा शेअर केला आहे. या फोटोमध्ये दोघेही एकमेकांकडे प्रेमाने पाहताना दिसत आहेत. या फोटोला कॅप्शन देताना वनिता खरात हिने लिहिले की, ‘लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा पार्टनर... लगन लागी रे तोसे पिया रे’. तिच्या या पोस्टने चाहत्याने लक्ष वेधून घेतले आहे. चाहते देखील तिच्या पोस्टवर कमेंट करून तिला शुभेच्छा देत आहेत. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातील वनिता खरातचे सहकलाकार अभिनेते समीर चौघुले यांनी देखील या पोस्टवर कमेंट करत त्यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
सौरभ चौघुले, श्याम राजपूत, शनिप्रिया इंदलकर यांनी देखील या पोस्टवर कमेंट करत वनिता खरात आणि सुमित लोंढे यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. गेल्यावर्षी २ फेब्रुवारी २०२३ रोजी वनिता खरात आणि सुमित लोंढे यांनी लग्नगाठ बांधली आहे. वनिताने काही मोजक्याच लोकांच्या उपस्थित बॉयफ्रेंड सुमित लोंढेसोबत सात फेरे घेतले होते. लग्न सोहळ्यात वनिताने पांढऱ्या रंगाची नऊवारी साडी नेसली होती. त्यावर सुंदर अशी ज्वेलरी परिधान केली होती. या लूकमध्ये ती खूप छान दिसत होती. तर, सुमित लोंढेने देखील मॅचिंग शेरवानी परिधान केली होती. त्याच्या शाही लूकने देखील सर्वांचे लक्ष वेधले होते.
वनिता खरात हिचा पती सुमित लोंढे हा एक व्हिडीओ क्रिएटर आणि व्लॉगर आहे. तो सतत फिरताना दिसतो. अशाच एका पिकनिक दरम्यान वनिता आणि सुमितची ओळख झाली होती. त्यानंतर हळूहळू त्या दोघांमध्ये छान मैत्रीचे नाते निर्माण झाले. लॉकडाउनच्या काळात त्यांच्या या मैत्रीत प्रेमाचे नाते फुलू लागले होते. त्यानंतर त्या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता.