Vanita Kharat Bad Experience at Dadar Station: मुंबई हे एक असं शहर आहे, जिथे प्रत्येकाच्या स्वप्नाला एक नवी वाट मिळते. या गजबलेल्या शहरांत दररोज लाखो लोक आपली स्वप्न घेऊन येतात. काहींची स्वप्न पूर्ण होतात, तर काहींना मात्र जगण्याचा नवा मार्ग सापडतो. या काळात काही लोकांना आयुष्यातील फार कठीण प्रसंगांना देखील समोरं जावं लागतं. अशीच एक घटना ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेत्री वनिता खरात हिच्यासोबत घडली होती. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत वनिता खरात हिने तिला आलेल्या एका वाईट अनुभवाबद्दल सांगितले आहे.
अभिनेत्री वनिता खरात ही ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कार्यक्रम आणि ‘कबीर सिंह’ या चित्रपटामुळे चर्चेत आली होती. विनोदाचं अचूक टायमिंग आणि धमाल अभिनय या तिच्या कलांनी अवघ्या महाराष्ट्रातील लोकांना खळखळवून हसवले. वनिता खरात हिने आपल्या अभिनयाच्या बळावर प्रेक्षकांच्या मनात हे हक्काचे स्थान मिळवले आहे. या सगळ्या प्रवासादरम्यान वनिता खरात हिने अनेक कठीण प्रसंगांना तोंड दिले आहे. न्यूड फोटोशूटमुळे देखील वनिता खरात चर्चेत आली होती. आता तिने नुकतीच एका युट्युब चॅनेलला मुलाखत दिली. यामध्ये तिने दादर रेल्वे स्थानकावर तिच्यासोबत घडलेल्या एका विचित्र प्रसंगाबद्दल सांगितलं आहे.
या घटनेबद्दल बोलताना वनिता खरात म्हणाली की, ‘एकदा मी माझ्या मैत्रिणीला सोडायला दादर स्टेशनवर गेले होते. तिची गाडी येईपर्यंत आम्ही सहजच एका कट्ट्यावर जाऊन गप्पा मारत बसलो होतो. तिला वॉशरूमला जायचं असल्याने ती तिथून गेली. मैत्रीण जाताच तिथे दोन अज्ञात तरुण घुटमळू लागले. त्यांनी माझ्याजवळ येऊन आधी नाशिकला जायची ट्रेन कधी येते? असा प्रश्न केला. अर्थात मला काही गाड्यांच्या वेळा माहित नव्हत्या. म्हणून मी त्यांना तिकीट खिडकीवर जायला सांगितलं. त्यावर त्यांनी विचारलं की, इथून दुसरी बस किंवा गाडी मिळेल का? तेव्हा मी त्यांना ‘बस स्टँडवर जाऊन विचारा’ असं सांगितलं.’
पुढे वनिता म्हणाली की, ‘माझं सांगून झाल्यानंतर देखील ते तरुण तिथेच घुटमळत होते. आणि अचानक त्यांनी मला विचारलं की, ‘इथे अशी काही सोय आहे का? आता मात्र मला वेगळाच संशय आला. म्हणून मी त्यांना विचारलं की, अशी म्हणजे काय? त्यावर ते दोघे म्हणाले की, ‘अशी म्हणजे १ तासाची वैगरे सोय होईल का?’ त्यांचा हा प्रश्न ऐकून मी काही वेळ भांबावून गेले. मला कळेचना की यांचं काय करू...दोन कानाखाली वाजवण्याची हिंमत असणारी मी तेव्हा मात्र सुन्न पडले होते.’
संबंधित बातम्या