मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Ashok Saraf : ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार जाहीर!

Ashok Saraf : ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार जाहीर!

Harshada Bhirvandekar HT Marathi
Jan 30, 2024 05:56 PM IST

Maharashtra Bhushan Award Ashok Saraf: अभिनेते अशोक सराफ यांना २०२३चा ‘महाराष्ट्र भूषण पुरस्कार’ जाहीर करण्यात आला आहे.

Maharashtra Bhushan Award Ashok Saraf
Maharashtra Bhushan Award Ashok Saraf

Maharashtra Bhushan Award Ashok Saraf: मराठी मनोरंजन विश्वातील दिग्गज अभिनेते अशोक सराफ यांना २०२३चा ‘महाराष्ट्र भूषण पुरस्कार’ जाहीर करण्यात आला आहे. नुकतीच या पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अधिकृत अकाऊंटवरून याची घोषणा करण्यात आली आहे. सीएमओ महाराष्ट्र या अकाऊंटवरून करण्यात आलेल्या या पोस्टमध्ये याची घोषणा करण्यात आली आहे. या पुरस्काराची घोषणा करताना लिहिण्यात आले की, ‘ज्येष्ठ मराठी चित्रपट आणि नाट्य अभिनेते अशोक सराफ यांना कला क्षेत्रातील भरीव योगदानासाठी २०२३ वर्षाचा मानाचा #महाराष्ट्रभूषण पुरस्कार देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. मुख्यमंत्र्यांनी अशोक सराफ यांच्याशी बोलून त्यांचे अभिनंदनही केले.’

पुढे या पोस्टमध्ये लिहिले की, ‘अशोक सराफ यांनी केवळ विनोदीच नव्हे, तर गंभीर स्वरूपापासून ते खलनायकी प्रवृत्तीपर्यंत विविध छ्टांचे दर्शन आपल्या अभिनयातून घडविले आणि रसिकांवर अधिराज्य गाजवले असे मुख्यमंत्र्यांनी त्यांचे अभिनंदन करतांना म्हटले आहे.’

मराठी चित्रपटसृष्टीसोबतच अशोक सराफ यांनी बॉलिवूड चित्रपटसृष्टीतही खूप नाव कमावले आहे. यादरम्यान अशोक सराफ यांनी अनेक मराठी टीव्ही मालिका आणि चित्रपटांमध्ये आपले अभिनय कौशल्य दाखवले आहे. अशोक सराफ यांचे नाव मराठी चित्रपटसृष्टीतील सर्वोत्कृष्ट आणि दिग्गज अभिनेत्यांमध्ये घेतले जाते. त्यामुळेच अशोक सराफ यांना मराठी चित्रपटसृष्टीचे ‘अभिनय सम्राट’ म्हटले जाते. मराठी चित्रपटसृष्टीत बालकलाकार म्हणून आपल्या करिअरची सुरुवात करणाऱ्या अशोक सराफ यांनी तब्बल २५० हून अधिक चित्रपट केले आहेत. अशोक सराफ यांनी आपल्या विनोदी भूमिकांच्या बळावर छोट्या पडद्यापासून मोठ्या पडद्यापर्यंत लोकांना खूप हसवले आहे.

अशोक सराफ यांच्या ‘अशी ही बनवाबनवी’मधील ‘धनंजय माने’ आणि सलमान खान-शाहरुख खानचा चित्रपट ‘करण अर्जुन’मधील ‘मुन्शी’ या व्यक्तिरेखेने सर्वांची मने जिंकली. अभिनय कारकिर्दीपूर्वी अशोक सराफ ‘स्टेट बँक ऑफ इंडिया’मध्ये काम करत होते. सुशिक्षित कुटुंबातील असल्यामुळे आपल्या मुलाने सरकारी नोकरी करावी, अशी त्यांच्या वडिलांची इच्छा होती. अशोक सराफ यांनी देखील वडिलांच्या इच्छेचा मान राखला आणि नोकरी देखील मिळवली. मात्र, त्यांना अभिनयाची ओढ शांत बसू देत नव्हती. त्यांनी नोकरीसोबतच अभिनयाला सुरुवात केली. हळूहळू ते पूर्णपणे अभिनय विश्वाकडे वळले आणि त्यांनी नोकरी सोडून दिली होती.

WhatsApp channel