मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Maharaj Review: शाब्बास पोरा! स्टारकिड असूनही आमिर खानच्या लेकाने निवडला हटके विषय! कसा आहे ‘महाराज’? वाचा...

Maharaj Review: शाब्बास पोरा! स्टारकिड असूनही आमिर खानच्या लेकाने निवडला हटके विषय! कसा आहे ‘महाराज’? वाचा...

Jun 25, 2024 05:38 PM IST

Maharaj Review In Marathi: अनेक स्टारकिड्सनी डेब्यूसाठी रोमान्स आणि ड्रामा चित्रपट निवडले. मात्र, जुनैदने ‘महाराज’सारखा चित्रपट निवडून आपलं वेगळेपण सिद्ध केलं आहे. यासाठी जुनैद खानचं कौतुक व्हायलाच हवं.

Maharaj Review In Marathi
Maharaj Review In Marathi

Maharaj Review In Marathi: गेल्या काही काळात धर्म आणि समाजात चालणाऱ्या पाखंडी बाबा आणि त्यांच्या अंधश्रद्धा अशा विषयांशी संबंधित अनेक चित्रपट आणि वेब सीरिज रिलीज होताना पाहायला मिळत आहेत. अशा विषयांच्या चित्रपट आणि सीरिजमधून अनेकदा अंधश्रद्धाळूपणे वावरणाऱ्या आपल्या समाजातील काही गटांवर थेट निशाणाही साधला गेला आहे. अशातच नुकताच ‘महाराज’ नावाचा एक चित्रपट नेटफ्लिक्सवर रिलीज झाला आहे. विशेष म्हणजे बॉलिवूड अभिनेता आमिर खान याचा मोठा मुलगा अर्थात जुनैद खान याने अशा हटके विषयाच्या चित्रपटातून बॉलिवूड डेब्यू केला आहे. तसं बघायला गेलं तर, आतापर्यंत अनेक स्टारकिड्स बॉलिवूडमध्ये पदार्पण करून आपलं स्थान निर्माण करायला बघत आहेत. यापैकी अनेकांनी डेब्यूसाठी रोमान्स आणि ड्रामा चित्रपट निवडले. मात्र, जुनैदने ‘महाराज’सारखा चित्रपट निवडून आपलं वेगळेपण सिद्ध केलं आहे. यासाठी खरंतर जुनैद खानचं कौतुक व्हायलाच हवं.

सुरुवातीला या चित्रपटावरून बरेच वादंग निर्माण झाले. या चित्रपटावर बंदीची मागणी देखील घालण्यात आली. गेल्या काही दिवसापासून याचं प्रदर्शन देखील रोखण्यात आलं होतं. मात्र, कोर्टाने बंदीचा निर्णय हटवताच निर्मात्यांनी ताबडतोब हा चित्रपट नेटफ्लिक्सवर रिलीज केला. आता नेटफ्लिक्सवर हा विषय आणि ‘महाराज’ चित्रपट ट्रेंड होताना दिसत आहे. बघायला गेलं तर, चित्रपटात काहीच वादग्रस्त किंवा वावग नाही. ‘महाराज’ हा चित्रपट एका खऱ्या घटनेवर आधारित आहे. चित्रपटातही फारशी सिनेमॅटिक लिबर्टी घेण्यात आलेली दिसली नाही. मात्र, समाजातील एका गटाने याला विरोध करण्याचं कारण अगदीच न पटणारं आहे. आता हा चित्रपट नेटफ्लिक्ससारख्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाला असल्याने, अगदी घरबसल्या बघता येणार आहे. आता तुम्हीही हा चित्रपट बघण्याचा विचार करत असाल, तर एकदा काय आहे याच कथानक ते नक्कीच जाणून घ्या.

चित्रपटाची कथा आहे तरी काय?

‘महाराज’ चित्रपटाची कथा भारताचा एक असा काळ दाखवते, जेव्हा देशावर इंग्रजांची सत्ता होती आणि समाजात अस्पृश्यता पाळली जात होती. ‘महाराज लायबल केस’ या प्रकरणावर हा चित्रपट आधारित आहे. कोणत्याही धर्माचा किंवा समाजाचा विरोध करणारा नाही तर, त्यातील चुकीच्या गोष्टींना लोकांसमोर आणून त्यांचे डोळे उघडण्याचा प्रयत्न करणारं हे प्रकरण आजही चर्चेत आहे. या चित्रपट महाराष्ट्र आणि मुंबई नाही तर, बॉम्बे आहे. त्याकाळी देशात इंग्रजांची सत्ता असली, तरी बॉम्बे अर्थात आताची मुंबईमधील काळबादेवी परिसरात कापूस व्यापारी असणाऱ्या गुजराती वैष्णव समाजाचा दबदबा होता. या भागात वैष्णवांच्या सात हवेल्या होत्या. याच हवेलीत त्यांच्या देवांची अर्थात भगवान श्रीकृष्णाची पूजा व्हायची. याच हवेल्यांमध्ये दर्शन घेतल्यानंतर तिथले लोक अन्नाचा घास तोंडात घालायचे.

ट्रेंडिंग न्यूज

एका दिवसांत ६० सिगरेट प्यायचे नाना पाटेकर! चेन स्मोकर असलेल्या अभिनेत्याने कसे सोडले व्यसन?

या सात हवेल्यांमध्ये एक मुख्य हवेली होती, ज्यात स्वतःला श्रीकृष्णाचा वंशज आणि अवतार मानणारे जदुनाथ महाराज अर्थात जेजे राहत होते. जेजे म्हणतील ती पूर्व दिशा अशी त्यांची ख्याती होती. जेजेला खरोखरच भगवान कृष्णाचा अवतार मानून लोक त्याची पूजा करत होते. तर, भक्तांच्या याच श्रद्धेचा फायदा घेऊन जेजे अनेक तरुण मुलींचे आयुष्य उद्ध्वस्त करत होता. चरण सेवा, शयन सेवा या नावांनी तो आपली शारीरिक हवस पूर्ण करत होता. मात्र, या समाजाच्या डोळ्यांवर अंधश्रद्धेची अशी पट्टी बांधली होती की, आपल्याच घरातील महिलांसोबत चाललेला हा अतिशय घाणेरडा प्रकार त्यांना पूजनीय वाटत होता. मात्र, याच समाजात एक असा तरुण होता, ज्याने जेजे विरोधात बंड पुकारला. या तरुणाचे नाव होते करसनदास.

मातृछत्र हरपल्यानंतर करसनदास आपल्या मामाकडे बॉम्बेमध्ये राहायला आला. त्याचे शिक्षण पूर्ण झाले आणि त्याच्या मनावर समाजसुधारक विचार कोरले गेले. तो वृत्तपत्रांमधून सातत्याने लिखाण करू लागला. त्याला साथ लाभली ती दादाभाई नवरोजी यांसारख्या थोर समाज सुधारकांची. त्याचे स्वतःचे काम सुरूच होते. करसनदासने समाज सुधारण्याचा विडा उचलला होता. मात्र, जेजेच्या तावडीतून तो आपल्या होणाऱ्या पत्नीला वाचवू शकला नाही. तिच्यासोबत नेमकं काय झालं? त्यानंतर करसनदासने जेजे विरोधात कसा बंड पुकारला आणि नक्की काय केलं, हे जाणून घेण्यासाठी ‘महाराज’ नक्कीच पाहायला हवा.

कसा आहे अभिनय?

सगळ्यात आधी तर आमिर खानच्या लेकाचं कौतुक करायला हवं. आता तुम्हाला वाटेल की का? पण, जिथे सध्या रोमान्स, ड्रामा आणि थ्रिलर जॉनरच्या चित्रपटांमधून कलाकार डेब्यू करण्याचा विचार करतात, तिथे जुनैदने एक असा विषय निवडला जो सगळ्यात अगदीच वेगळा ठरला. या चित्रपटात कोणताही मालमसाला नसल्यामुळे केवळ जुनैदच्या अभिनयावर सगळ्यांचे लक्ष केंद्रित झाले. जुनैद खानने थिएटर केले असल्यामुळे त्याच्या अभिनयात थोडासा अधिकचा लाऊडनेस होता. पण, त्याने साकारलेला करसनदास तुम्हाला त्याकाळात नक्कीच घेऊन जाईल. त्याची संवादफेक स्टाईलही विशेष लक्ष वेधून घेणारी आहे. आमिर खानप्रमाणेच त्याचा मुलगाही स्वतःचा वेगळेपणा सिद्ध करण्यात यशस्वी ठरला आहे.

Bigg Boss OTT 3: ‘बिग बॉस ओटीटी ३’मध्ये पहिल्याच आठवड्यात स्पर्धकांना बसणार शॉक! कोण होणार बेघर?

जुनैदसोबतच या चित्रपटात जयदीप अहलावत मुख्य भूमिकेत दिसला आहे. अभिनेता जयदीप अहलावत याने जेजेची भूमिका साकारली आहे. एकीकडे नावखा जुनैद तर दुसरीकडे अभिनय क्षेत्रातला मातब्बर जयदीप. मात्र, दोघांनीही एकमेकांच्या तोडीस तोड काम केलं आहे. जयदीप नेहमीप्रमाणेच उत्तम काम करताना दिसला आहे. तर, शालिनी पांडे हिने किशोरीची अर्थात करसनदासच्या होणाऱ्या पत्नीची भूमिका साकारली आहे. ती थोड्यावेळासाठीच स्क्रीनवर दिसते. मात्र, तिच्या भूमिकेला कथेत जितके वजन आहे, तितके चित्रपटात नाही. या उलट सगळ्यात जास्त भाव खाऊन जाते ती अचानक एन्ट्री करणारी शर्वरी वाघ. करसनदासच्या कामात साथ देऊन त्याच्या प्रत्येक पावलावर त्याच्यासोबत उभी राहणारी ही व्यक्तिरेखा शर्वरीने अतिशय सुंदर साकारली आहे. डॉ. भाऊदाजी लाड यांच्या भूमिकेत मराठमोळा अभिनेता वैभव तत्ववादी अगदी काही मिनिटांसाठी दिसला असला, तरी लक्षात राहतो. एकूणच सगळ्या कलाकारांनी आपापल्या भूमिका उत्तम साकारल्या आहेत.

चित्रपटाच्या इतर बाजू कशा आहेत?

'महाराज'मध्ये हाणामारीचा एकही सीन नाही. ही संपूर्ण कथा एका कोर्ट केसवर आधारित आहे. पण, स्नेहा देसाई आणि विपुल मेहता यांनी लिहिलेल्या या चित्रपटाच्या पटकथेत ड्रामा, इमोशनसोबतच कॉमेडी आणि रोमान्सचाही वापर करण्यात आला आहे. सुरुवातीपासून शेवटपर्यंत, सिद्धार्थ पी मल्होत्राचा हा चित्रपट दमदार संवादांमुळे लक्षात राहतो. ‘मजदूर हड़ताल पर जा सकते हैं, ईश्वर नहीं’, ‘जन्म से वैष्णव हूं, कर्म से ब्राह्मण, स्वभाव से क्षत्रिय हूं, और ध्येय है मेरा क्षुद्र का, इसलिए जहां भी गंदगी देखता हूं, वहां साफ करने की कोशिश करता हूं’, ‘सवाल न पूछे वो भक्त अधूरा और जवाब न दे सके वो धर्म अधूरा’ असे अनेक दमदार संवाद लक्षात रहाणारे आहेत. या सगळ्याचा अनुभव घेण्यासाठी ‘महाराज’ हा चित्रपट एकदा आवर्जून बघायलाच हवा.

चित्रपट : महाराज

कुठे बघाल? : नेटफ्लिक्स

दिग्दर्शक : सिद्धार्थ पी मल्होत्रा

कलाकार : जुनैद खान, जयदीप अहलावत, शालिनी पांडे, शर्वरी वाघ

रेटिंग : ४ स्टार

WhatsApp channel