Junaid Khan Reaction On Social Media: बॉलिवूड अभिनेता आमिर खान याचा मुलगा जुनैद खान त्याच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘महाराज’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. बऱ्याच वादानंतर त्याचा हा चित्रपट अखेर ओटीटीवर प्रदर्शित झाला आहे. जुनैद खान आता ‘महाराज’ चित्रपटाच्या यशाचा आनंद घेत आहे. इतर बॉलिवूड अभिनेत्यांप्रमाणे नव्हे तर, जुनैदने त्याच्या वडिलांप्रमाणे स्वतःला लाईम लाईटपासून दूर ठेवले आहे. जुनैद कोणताही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वापरत नाही. नुकतीच जुनैद खान याने स्वतः ही गोष्ट मान्य केली आणि त्यामागचे खरे कारणही सांगितले आहे.
जुनैद खान सोशल मीडियावर का नाही? या प्रश्नाचं उत्तर देताना अभिनेता म्हणाला की, 'मी कसा दिसतो हे लोकांना माहीतच नव्हते. कारण मी कधीच सोशल मीडियाचा वापर केला नाही. सध्या सोशल मीडियाचा ट्रेंड असला, तरी मी त्यात सामील होणार नाही. असा कोणताही निर्णय मी मुद्दाम घेतलेला नाही, हे ओघाओघात झाले.
जुनैद खान स्टारर 'महाराज' या चित्रपटाने २२ देशांच्या नॉन-इंग्लिश चित्रपटांच्या टॉप टेन यादीत स्थान मिळवले आहे. या चित्रपटाने नेटफ्लिक्सच्या नॉन-इंग्रजी टॉप टेनच्या यादीत दुसरा क्रमांक पटकावला आहे. रिलीजच्या दुसऱ्या आठवड्यात या चित्रपटाला ५.३ दशलक्ष व्ह्यूज मिळाले आहेत. या चित्रपटात जुनैद खानने करसनदास मुलजी यांची भूमिका साकारली आहे. जुनैदची ही भूमिका समीक्षकांनाही खूप आवडली आहे. या चित्रपटाबद्दल बोलताना तो म्हणाला की, 'महाराज'पूर्वी त्याला अनेक चित्रपटांच्या ऑफर येत होत्या. पण, त्याला चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्याची घाई नव्हती. जुनैदने वयाच्या ३१व्या वर्षी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. याआधी तो अनेक वर्षे रंगभूमीवर काम करत होता.
दिग्दर्शक सिद्धार्थ मल्होत्रा आणि निर्माता आदित्य चोप्रा यांना त्यांच्या 'महाराज' चित्रपटासाठी जुनैद परफेक्ट वाटला, त्यानंतर जुनैदलाही चित्रपटाची स्क्रिप्ट आवडली. जुनैद खानच्या आगामी प्रोजेक्ट्सबद्दल बोलायचे झाले तर, तो साई पल्लवीसोबत एका प्रेमकथेत दिसणार आहे. या दोघांनी नुकतेच या चित्रपटाचे जपानमधील शेड्यूल पूर्ण केले आहे. जुनैदचे वडील आमिर खान या चित्रपटाची निर्मिती करत आहेत. ‘वन डे’ या चित्रपटाव्यतिरिक्त जुनैद खानकडे खुशी कपूरसोबत एक रोमँटिक कॉमेडी चित्रपटात देखील झळकणार आहे. दोघांनी मुंबई आणि दिल्ली एनसीआरमध्ये पहिल्या टप्प्याचे शूटिंग पूर्ण केले आहे.